समीर नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भारतात जी श्रीराम प्रभूंची प्रतिमा आहे, ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. लहानपणी कळेलेले श्रीराम आणि आता या वयात कळेलेला त्यामध्ये मोठा फरक आहे. आता मला जो श्रीराम कळाला तो लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मी 'आदीपुरुष' चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे, असे मत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.प्रभू श्रीराम यांचे जीवन, त्यांचे आचरण यातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आजच्या पिढीला श्रीराम कळावा, त्यांचे जीवन व त्यांनी केलेला समाज उद्धार कळावा यासाठीच आदीपुरुष घेऊन येत आहे. सुमारे ५५० कोटी या चित्रपटाचे बजेट आहे. तसेच प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान, देवदत्त नागे, सनी सिंग, वत्सल शेट यांसारखे कलाकार यामध्ये आहेत.
श्रीरामाचे वेगळे स्वरूप या चित्रपटातून लोकांना पाहायला मिळणार आहे, असे राऊत यांनी सांगितले. आदीपुरुष हा सध्या हिंदी, आणि तमिळ भाषेतून प्रदर्शित होणार आहे. तसेच इंग्रजी भाषेत आम्ही यापूर्वीच डब केलेला आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन, जपानी अशा भाषांमध्ये देखील आम्ही डब करणार आहोत. जेणेकरून श्रीराम जागतिक स्तरावर पोहोचावेत, असेही ते म्हणाले.
ऐतिहासिक गोष्टीवर असंख्य चित्रपट काढू शकतो
देशाला समृद्ध असा इतिहास लाभला आहे. येथे प्रत्येक पैलूवर चित्रपट काढू शकतो. आता ऐतिहासिक चित्रपटांचा ट्रेंड आहे. असे वाटत असले तरी यापूर्वीही अनेक चित्रपट इतिहासांच्या संदर्भाने आले आहेत. माझ्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. कारण आजच्या पिढीला इतिहास कळाला पाहिजे. इतिहासातून खूप काही शिकायला मिळते. आता जर नवभारत निर्माण करायचा असेल तर इतिहास जाणणे आवश्यक आहे, असेही राऊत यांनी सांगितले. चित्रपटाची कहाणी महत्त्वाची असते. ती चांगली असली की कुठल्याही भाषेत चित्रपट असला तरी चालतो. आता आधुनिक तंत्रज्ञानदेखील खुप मदतीचे ठरत आहे. यातून आपण लोकांना आकर्षित करु शकतो. चित्रपट एकंदरीत चांगला असला की प्रेक्षकही चांगला प्रतिसाद देतात.
...म्हणून प्रभासची निवड
प्रभास हा जागतिक स्तराचा सुपरस्टार आहे. पण जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत काम करता तेव्हा प्रभास खऱ्या अर्थाने कळतो. एवढा मोठा स्टार असला तरी त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहे. त्याच्या मनात दया, प्रेम या भावना भरलेल्या आहेत. प्रभासच्या डोळ्यात ती निरागसता आहे, कारण त्याचे मन स्वच्छ आहे. त्याच्यापेक्षा आताच्या काळात प्रभु श्रीरामाची भूमिका कुणीच चांगली करू शकला नसता. त्याच्यासोबत काम करणे म्हणजे प्रत्येकाला पर्वणीच होती, असे राऊत यांनी प्रभास सोबतचा अनुभव सांगताना म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"