लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : राज्यातील १२ तालुक्यांपैकी ४ तालुक्यांमध्ये प्रशासकीय इमारतींची स्थिती चांगली आहे. उर्वरित ८ तालुक्यांतील प्रशासकीय इमारतींची स्थिती फारशी चांगली नाही. विविध कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांसह प्रशासकीय कार्यालयात काम करणाऱ्यांना काम करणे सोपे व्हावे, म्हणून आठही तालुक्यांत एका वर्षात अत्याधुनिक सुविधा असलेल्या इमारती उभारणार, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
फातोर्डा पोलिस स्थानकाच्या नव्या इमारतीच्या पायाभरणी कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, पोलिस महासंचालक अलोक कुमार, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, फातोर्डा पोलिस स्थानक हे सर्व सुविधांनी युक्त असेल. ते राज्यातील एक मॉडेल पोलिस स्थानक म्हणून तयार करणार येणार आहे. त्यानंतर राज्यातील विविध भागांत अशाच प्रकारची पोलिस स्थानक इमारत उभारणार आहे.
फातोर्डा पोलिस स्थानक व पोलिस क्वॉटर्स उभारण्यासाठी सुमारे २२ कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. सरकारवर ३० हजार कोटी रुपये कर्ज आहे. असे असले तरी गेल्या ४ महिन्यांत सरकारने एकही रुपया कर्ज घेतलेले नाही. सरकारच्या योजना लोकांपर्यंत वेळेवर पोहोचाव्यात, लोकांना चांगली सेवा मिळावी, यासाठी सरकार काम करीत आहे. सरकारची आर्थिक स्थिती खूप चांगली आहे.
बोर्डा येथील आयटीआय इमारत नव्याने बांधली जाईल, तसेच बोर्डा मल्टीपर्पज स्कूल व कॉलेज इमारतही उभारली जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. फातोर्डा पोलिस स्थानक इमारत व पोलिस वसाहत एका वर्षात बांधून पूर्ण करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. फातोर्डाचे आमदार सरदेसाई यांनी आपल्या संडे डायलॉग कार्यक्रमात केवळ सरकारवर टीका न करता सरकारने केलेल्या चांगल्या कामांची स्तुतीही करावी, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.
मडगावचे लोकही फातोर्डाकडे वळू लागले
फातोर्डा पोलिस स्थानकाच्या इमारतीचे सात वर्षापूर्वी घाईगडबडीत उद्घाटन करण्यात आले होते, कारण ते त्यावेळी गरजचे होते. मात्र, सदर पोलिस स्थानकाची इमारत सुरक्षित नव्हती, म्हणून आपण नवीन इमारत बांधून देण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे केली होती, त्यांनी ती मान्य केली व कामाला सुरुवात करण्यात आली, असे विजय सरदेसाई म्हणाले. फातोर्डा मतदारसंघातील सर्वच भागांत सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, जेणेकरून वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांना सोपे होईल. फातोर्डा मतदारसंघ एक मॉर्डन मतदार झाला आहे. मडगावचे लोकही आता फातोर्डामध्ये राहू लागले आहेत, असेही सरदेसाई म्हणाले.