पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: दक्षिण गोवा कोमुनिदादचे प्रशासक प्रदीप नाईक आपली जबाबदारी नीट पार पाडत नसल्याची वारंवार तक्रारी आल्यानंतर सरकारने अखेर त्यांना सेवेतून निलंबित केले आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिला होता.
त्यानंतर नाईक यांच्या निलंबनाचा आदेश दक्षता खात्याचे संचालक दीपक बांदेकर यांनी शुक्रवारी जारी केला. यात कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा ठपका ठेवून नाईक यांना निलंबित केले जात असल्याचे आदेशात नमूद केले आहे. आमदार विजय सरदेसाई यांनी या कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
दक्षिण गोवा कोमुनिदादचे प्रशासक हे अत्यंत महत्वाचे पद आहे. त्यांच्याकडे लोक नेहमीच आपली कामे घेऊन जातात. मात्र ते अनेकदा कामावर गैरहजर असणे, जबाबदारी नीट पार न पाडणे, कार्यालयात मद्यपान करुन येणे, कामे करण्यास टाळाटाळ करणे. यामुळे कामे होत नसल्याच्या आदी तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या.