नारायण गावस, पणजी: राजकीय, सामाजिक, सहकार, साहित्यिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व. कोकण मराठी परिषदेचे संस्थापक, माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲड. रमाकांत खलप व त्यांच्या पत्नी सौ निर्मला खलप यांना महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा (पिंपरी चिंचवड विभाग पुणे) सापत्नीक "यशवंत-वेणू" पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा पणजीत इन्स्टिटयूट मिनेझिस ब्रागांझा परिषद सभागृहात २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड विभाग पुणेचे अध्यक्ष श्री. पुरूषोत्तम सदाफुले यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी त्यांच्या सोबत इन्स्टिटयूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब व कालिका बापट उपस्थित होत्या.
यशवंतराव चव्हाण व त्यांच्या पत्नी वेणूताई यांची आदर्श संसारी दांपत्य म्हणून ओळख आहे. यशवंतराव चव्हाण हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या पत्नीने साथ दिली. आजच्या राजकीय नेत्यांना त्यांच्या कार्याबद्दल जाण होणे गरजेचे आहे. म्हणून हा पुरस्कार देण्यात येतो. गेली २५ वर्षे हा पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानातर्फे देण्यात येत असून, गेले २४ पुरस्कार हे महाराष्ट्रात दिले गेले आहे. हा २५ वा पुरस्कार पहिल्यांदाच इतर राज्यातून कुणाला दिला जात आहे. अशीही माहिती पुरूषोत्तम सदाफुले यांनी दिली आहे.
दरम्यान, ॲड. रमाकांत खलप व त्यांच्या पत्नी सौ. निर्मलाताई खलाप यांना हा पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मा.दामोदर मावजो यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, व मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब उपस्थित असणार आहे.