पणजी : गोव्यात लोकशाहीचे रक्षण करण्याच्यादृष्टीने माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांना योग्य तो सल्ला द्यावा, असे मत काँग्रेसचे नेते तथा आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.
भाजपाचे ज्येष्ठ नेते अडवाणी हे गोवा भेटीवर आले आहेत. अडवाणी हे विश्रंतीसाठी प्रथमच सात दिवस गोव्यात असतील. त्यांचा मुक्काम दोनापावल येथील राजभवनवर आहे. राजधानी पणजीपासून तीन किलोमीटर अंतरावर राजभवन आहे. अडवाणी यांचे राज्यपाल श्रीमती सिन्हा यांनी स्वागत केल्याची छायाचित्रेही शुक्रवारी सर्वत्र झळकली. या पाश्र्वभूमीवर लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी रेजिनाल्ड म्हणाले की मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने सरकार चालत नाही. प्रशासनावर परिणाम झाला आहे. राज्यपाल सिन्हा यांनी या विषयात लक्ष घालावे अशी विनंती आम्ही अनेकदा केली. काँग्रेसचे आमदार बऱ्याचदा राज्यपालांना भेटले पण राज्यपाल काहीच कृती करत नाहीत.
रेजिनाल्ड म्हणाले, की विधानसभा अधिवेशनाचा कालावधी सरकारने फक्त तीन दिवसांचा केला आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी फक्त दोनच दिवस मिळतील. कारण पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होईल, आणखी काही कामकाज होणार नाही. मुख्यमंत्री र्पीकर यांना संसदीय लोकशाहीच मान्य नाही. विरोधकांनी लोकांच्या समस्या मांडू नयेत व प्रश्न विचारू नयेत असे त्यांना वाटते. अडवाणी हे गोव्यात असून त्यांचा राजभवनवर निवास असल्याने त्यांनी राज्यपालांना गोव्यात लोकशाही सांभाळण्याच्यादृष्टीने उपदेश करावा. गोवा हुकूमशाहीच्या दिशेने चालू लागला आहे. एका र्पीकर यांच्यासाठी पूर्ण गोव्याला वेठीस धरले जात आहे. अडवाणींनाही हुकूमशाही मान्य नसेलच. अशावेळी राज्यपालांनी कोणती कृती करायची असते हे अडवाणींनी राज्यपालांना सांगितले तर ते गोव्याच्या हिताचे ठरेल. राज्यासाठी उपकारक ठरेल.