पणजी : गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला आणखी एक दणका बसला असून गेली २५ वर्षे चार्टर विमान सेवा देणाऱ्या फिन एअर कंपनीने पुढील महिन्यापासून गोव्यातील आपली नियमित विमानसेवा बंद करण्याचा विचार चालवला आहे. यामुळे स्कँडेनेव्हियन राष्ट्रांचे पर्यटक गोव्याला गमवावे लागतील.
मिळालेल्या माहितीनुसार, फिन एअर कंपनीची आठवड्याला दोन नियमित विमाने गोव्यात येतात. वर्षभरापूर्वी चार्टर विमानांचे रूपांतर कंपनीने नियमित विमानांमध्ये केले होते. परंतु ९० पेक्षा अधिक पर्यटक या विमानाला कधी चार्टर ऑपरेटरकडून मिळाले नाहीत. अल्प प्रतिसादामुळे ही सेवा बंद करण्याचा विचार आता कंपनीने चालवला आहे.
२०१४-२०१५ मध्ये जर्मनीच्या एका चार्टर कंपनीने अशीच गोव्यातील चार्टर विमान सेवा बंद केली होती. ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा या संघटनेचे अध्यक्ष सावियो मेशियस यांनी या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, सरकारला आम्ही वेळोवेळी जागरुक केलेले आहे. विदेशी पर्यटकांची बाजारपेठ हातातून निसटत आहे. एकेक चार्टर विमाने बंद होत आहेत. ही राज्यातील पर्यटन व्यवसायाला धोक्याची घंटा आहे. ते म्हणाले की, स्कँडिनेव्हियन राष्ट्रांच्या पर्यटकांची आजवर गोव्यासाठी मोठी बाजारपेठ राहिलेली आहे.
गोव्याचा पर्यटन हंगाम साधारणपणे ऑक्टोबरमध्ये सुरू होतो. यंदा हंगामाच्या सुरवातीलाच चार चार्टर विमाने रद्द झाल्याने व्यावसायिक चिंतेत होते. मेसियश यांचे असे म्हणणे आहे की, इजिप्त आणि तुर्कीकडे पर्यटक वळू लागले आहेत. कारण गोव्यापेक्षा पर्यटकांना तेथे सफर करणे स्वस्त पडते. भौगोलिक व राजकीय कारणास्तव गेली काही वर्षे इजिप्तकडे पर्यटकांनी पाठ फिरवली होती परंतु आता ते या देशाकडे वळू लागले आहेत. गोवा सरकारने चार्टर विमानांना शक्य तेवढ्या अधिक सवलती द्यायला हव्यात, अशी मागणी आम्ही नेहमीच करीत असतो. परंतु सरकारकडून याबाबतीत काही प्रतिसाद मिळत नाही.
अधिकृत माहितीनुसार गेल्या वर्षी पर्यटक हंगामात ९८१ चार्टर विमाने आली आणि त्याव्दारे २ लाख ४७ हजार ३६५ विदेशी पर्यटकांनी भेट दिली. त्यात रशियन पर्यटकांचा भरणा जास्त होता. इंग्लंड, युक्रेन, कझाकीस्तानमधूनही चार्टर विमाने येतात. यंदा चार्टर विमान यांची संख्या निम्म्याने घटली असून पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे.