पणजी : अकरा दिवसांच्या खंडानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सोमवारी दुपारी अडीच वाजता पर्वरी येथील मंत्रालय तथा सचिवालयात दाखल झाले. पर्रीकर यांनी सचिवालयात बसून सरकारी अधिका-यांकडून काही कामांचा आढावा घेतला. सायंकाळी साडेपाच वाजता पर्रीकर सचिवालयातून घरी गेले. मात्र ते मंगळवारी पुन्हा येतील, असे सूत्रांनी सांगितले.मुख्यमंत्री पर्रीकर हे चार महिन्यांच्या खंडानंतर गेल्या 1 व 2 जानेवारी रोजी सचिवालयात दाखल झाले होते. दोन तास सचिवालयात बसून त्यांनी काम केले होते. नंतर मात्र ते वैद्यकीय उपचारांमुळे 11 दिवस मंत्रालयात येऊ शकले नव्हते. मुख्यमंत्र्यांना केमोथेरपी दिली जात होती, असे सूत्रांनी सांगितले. पर्रीकर यांची प्रकृती आता थोडी सुधारली असून, सोमवारी दुपारी अडीच वाजता ते सचिवालयात दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत एक छोटा कार्यक्रमही झाला. पर्रीकर 2018 साली वैद्यकीय उपचारांमुळे चार महिने मंत्रालयात आले नव्हते. त्यामुळे प्रशासन ठप्प झाल्याची टीका आमदार, मंत्रीही करत होते. मंत्रिमंडळाच्याही बैठका होत नव्हत्या. मंत्रलयात मंत्रिमंडळाची एकही बैठक गेले चार महिने झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी आपल्या करंजाळे येथील खासगी निवासस्थानी मात्र मंत्रिमंडळाच्या दोन बैठका घेतल्या. या महिन्यात अजून बैठक झालेली नाही. ती यापुढे होऊ शकेल. दरम्यान, पर्वरी येथे रविवारी सायंकाळी स्थानिक आमदार व महसूल मंत्री रोहन खंवटे यांनी नोमोझो कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या सोहळ्य़ाला क्रिकेटपटू युवराज सिंग उपस्थित होता. मुख्यमंत्री पर्रीकर हे त्या सोहळ्य़ाला येतील, असे मंत्री रोहन खंवटे यांनी जाहीर केले होते. मात्र पर्रीकर तिथे पोहोचले नव्हते.
अकरा दिवसांच्या खंडानंतर मनोहर पर्रीकर पुन्हा सचिवालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 5:53 PM