मडगाव: गोव्यात सुरू होणा-या इफ्फीची लगबग नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस समाप्त होत असतानाच डिसेंबरच्या सुरुवातीला मडगावातही रिल्स ऑन हिल्स या दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाची खासियत म्हणजे, त्यात धावण्यावरचे आणि सायकलिंगवर आधारित सहा चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. धावराणी पी.टी. उषा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.रवींद्र भवन मडगाव आणि साष्टी फिल्मस् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला हा महोत्सव 1 व 2 डिसेंबर रोजी होणार आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या प्रतिनिधींना पी. टी. उषा बरोबर धावण्याचीही संधी मिळणार आहे, अशी माहिती रवींद्र भवनचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली. या महोत्सवात अमेरिकन, युरोपियन आणि भारतीय चित्रपट निर्मात्यांचे उत्कृष्ट आणि पुरस्कार जिंकलेल्या सहा चित्रपटांचा समावेश असून त्यात अमेरिकेचे निकॉलस शंक्र यांनी दिग्दर्शित केलेला ब्लड रोड, स्वीर्त्झलंडच्या पीएरी मोराथ यांचा फ्री टू रन, कॅनेडियन दिग्दर्शक अंजली नायर हिचा गन रनर्स, कॅनडाच्याच डेरेक फ्रान्कोवस्की व रायन गीब यांचा लाईफ साईकल्स, नेदरलँडच्या अनिका इटलिस व तिमोथी जेम्स केन यांचा द बार्कले मेरेथॉन्स व भारताच्या अक्षय शंकर व पवित्र चलम यांच्या टू फीट टू फ्लाय या चित्रपटांचा समावेश असेल. त्याशिवाय 1923 ते 33 या दरम्यान मुंबईतील सात पारशानी सायकलवरुन केलेली जगभ्रंमतीवर आधारित ग्लोब राईडस् ऑन हम्बल बाईक्स या विषयावरील छायाचित्रंचे प्रदर्शनही मांडण्यात येणार आहे.1 डिसेंबरला सायंकाळी 4 वा. या महोत्सवाचे पी.टी. उषा यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून यावेळी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई उपस्थित रहाणार आहेत. दुस-या दिवशी सकाळी 7 वा. महोत्सव प्रतिनिधींची पी.टी. उषा बरोबर दौड होणार आहे. तर 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते 7 या दरम्यान प्रतिनिधींना पी. टी. उषा बरोबर संवाद साधता येणार आहे. या महोत्सवाबद्दल सांगताना रवींद्र भवनचे अध्यक्ष नाईक म्हणाले, मागच्या वर्षी आम्ही सायकलींगवर चित्रपट महोत्सव आयोजीत केला होता. या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद पाहून यंदा दौड आणि सायकलींग हे दोन्ही विषय एकत्र घेऊन आम्ही यंदाचा महोत्सव आयोजित केला आहे. यापुढेही आम्ही क्रीडा प्रकारावर आयोजीत फिल्म महोत्सव घडवून आणू. यावेळी त्यांच्याबरोबर साश्टी फिल्मच्या साविया व्हिएगस याही उपस्थित होत्या.
इफ्फी पाठोपाठ मडगावातही रिल्स ऑन हिल्स चित्रपट महोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 4:03 PM