मडगाव - एटीएम मशिन्सना स्किमर लावून खातेधारकांना तब्बल दीड कोटींना लुटण्याचा प्रकार काही महिन्यापूर्वी म्हापसा येथे झालेला असतानाच गोव्यातील मुख्य व्यावसायिक बाजारपेठ असलेल्या मडगावातही असाच प्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. मडगावातील सुमारे 15 जणांना यामुळे लाखोंचा फटका बसला आहे. हे प्रकरण आताच उघडकीस आले असून त्यामुळे लुटले जाणाऱ्यांची संख्या याहीपेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मडगावातील विविध बँकांतील ग्राहकांच्या खात्यातून ठाणे, मुंबई येथील एका शाखेतून अशाप्रकारे रक्कम वळविल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणात आता मडगाव पोलीस मुंबईच्या पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्याच्या तयारीत आहेत. फक्त मडगावातच नव्हे तर जवळपासच्या गावातूनही अशा तक्रारी आल्याची माहिती मडगाव पोलिसांनी दिली. काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार म्हापसा येथे घडला होता. म्हापसा शहरही गोव्यातील प्रमुख बाजारपेठेपैकी एक असून येथील सुमारे 40 जणांना दीड कोटींचा फटका बसला होता.
गोव्यात यापूर्वीही अशाप्रकारे स्किमरच्याद्वारे बँक ग्राहकांना लुटण्याच्या कित्येक घटना घडल्या असून काही विदेशी नागरिकांची टोळी अशा चोरीत सामील असल्याचे उघडकीस आले होते. म्हापशात ग्राहकांना लुटण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर काही दिवसांतच म्हापशातील बँक ऑफ इंडियाच्या एटीएमला स्किमर बसविताना पेत्रोव मॅटचेनव (47) व मिलान दावरेंको (47) या दोन बल्गेरियन नागरिकांना अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच आता मडगावच्या ग्राहकांनाही अशाप्रकारे गंडा बसल्याचे उघडकीस आले आहे.
मागच्या वर्षीही अशाप्रकारच्या कित्येक चोऱ्या उघडकीस आल्या होत्या त्यावेळीही काही बल्गेरियन नागरिकांना अटक झाली होती. ज्या एटीएमवर सुरक्षा रक्षक नाहीत अशी एटीएम्स या चोरट्यांकडून लक्ष्य केली जात असल्याचेही दिसून आले आहे. एका करंगळीवर मावणार एवढय़ा आकाराचे स्कीमर मशिन एटीएमच्या वर बसवून त्यात रेकॉर्ड केल्या जाणाऱ्या कार्डच्या माहितीवरुन ही रक्कम चोरली जात होती.