पणजी - राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात भाग घेतल्याने अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती हे अडचणीत आले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी नावती यांच्याकडे याबाबत स्पष्टिकरण मागितले आहे.
आयएएस अधिकारी असलेले कुणाल यांनी यास दुजोरा देताना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाग घेतल्याबद्दल नावती यांना खुलासा करण्यास सांगितले असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. सरकारमध्ये घटक असलेल्या मगोपने एका स्थानिक कल्चरल क्लबच्या सहयोगाने शनिवारी फोंडा येथे मारुती मंदिरात हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यात नावती यांच्या हस्ते बक्षिस वितरण झाले होते. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
नावती यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून मी यात सहभागी झालो. तो राजकीय पक्षाने आयोजित केला आहे याची कल्पना मला नव्हती. आयोजक माझ्या शेजारी राहतात, त्यांनी मला बोलावले होते. कुठल्याही राजकीय पक्षाने निमंत्रण दिलेले नव्हते. श्रीकृष्ण कल्चरल क्लबने निमंत्रित केल्याने प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थिती लावली. घुमट आरती स्पर्धा आणि स्थानिक कलाकारांचा सत्कार असे या कार्यक्रमाचे स्वरुप होते. कुठल्याही राजकीय पक्षाचा आमदार, खासदार, मंत्री किंवा पक्षाचा अध्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित नव्हता. फोटोमध्ये व्यासपीठावर मागच्या बाजुला दिसणारा बॅनर हा समारोप सोहळ्याचा आहे.’
नावती पुढे म्हणाले की, ‘ मी कधीच कायद्याचा भंग करीत नाही. तरीही आरोप झाल्याने त्याला उत्तर देणे ही माझी नैतिक जबाबदारी मी मानतो. माझ्याकडे कोणीही स्पष्टीकरण मागितलेले नाही परंतु नैतिक जबाबदारी म्हणून मी याबाबत खुलासा करणार आहे.’