पणजी - श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये तब्बल आठ ठिकाणी रविवारी (21 एप्रिल) साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. ईस्टर संडेला झालेल्या या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 156 जणांचा मृत्यू झाला असून 400 हून अधिक जण जखमी झाले आहेत. कोलंबोमधील बॉम्बस्फोटानंतर गोव्यातील चर्च तसेच महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. या हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
कोलंबोतील बॉम्बस्फोटानंतर पोलीस महासंचालकांशी आपण बोललो असून आवश्यक ते निर्देश दिलेले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, ‘खबरदारीच उपाययोजना म्हणून चर्च तसेच महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षेबाबत मी आढावा घेतलेला आहे. आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव यांच्याशीही चर्चा करुन आणखी काय करणे आवश्यक आहे हे पाहू.’ चर्चच्या सुरक्षेत कोणतीही कसूर राहू नये याची खबरदारी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. गोव्यात जुने गोवे येथे सेंट झेवियरचे बॉ जिझस बासिलिका चर्च तसेच अन्य महत्त्चाची चर्च आहेत. राज्यातील ख्रिस्ती लोकसंख्या सुमारे 27 टक्के आहे.
Sri Lanka bomb blasts : श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आठवा बॉम्बस्फोट, संचारबंदी लागूश्रीलंकेच्या कोलंबोमध्ये तब्बल आठ ठिकाणी रविवारी (21 एप्रिल) साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यातील तीन बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर 3 बॉम्बस्फोट हे हॉटेलमध्ये झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र त्यानंतर आता आणखी दोन बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत. सातव्या बॉम्बस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर आठव्या बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. श्रीलंकेत संध्याकाळी 6 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोलंबो येथे झालेल्या स्फोटांमुळे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ईस्टर संडेला झालेल्या या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 156 जणांचा मृत्यू झाला असून 400 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कोलंबोतील बॉम्बस्फोटांच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे' असं ट्वीट सुषमा स्वराज यांनी केलं आहे.