पणजी: निवारा गृह योजने अंतर्गत मिळत असलेले अनुदान गेल्या दोन वर्षांपासून महिला आणि बालकल्याण खात्याने दिले नव्हते, या अनुषंगाने गेल्या आठवड्यात दोन निवारा केंद्रे चालवीत असणाऱ्या स्ट्रीट प्रोवीडन्स संस्थापक डॉनल्ड फर्नांडिस यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेत आपली व्यथा सांगितली होती. दरम्यान त्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते, अखेर बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून ४० लाख रुपयांचे अनुदान जारी करण्यात आले आहे.
महिला आणि बालकल्याण खाते नेहमीच अनुदान प्रक्रिया सुुर असल्याचे उत्तर आम्हाला देत होते, मात्र प्रत्यक्षात काहीच हालचाली होत नव्हत्या. फाईल देखील मुद्दामहून अडवून ठेवण्यात येत होत्या. या जाचाला कंटाळून मी माझ्या निवारा केंद्रात असलेल्या सर्व सदस्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो. मुख्यमंत्री आपले आश्वासन पाळले, आणि आम्हाला अनुदान मिळवून दिले, यासाठी त्यांचे आभार, असे स्ट्रीट प्रोवीडन्स संस्थापक डॉनल्ड फर्नांडिस यांनी सांगितले.
आम्हाला २०२१-२२, व २०२२-२३ या वर्षाचे अनुदान देण्यात आले नव्हते. यासंदर्भात मागील वर्षभर आम्ही खात्यात येउन चौकशी करत होतो,पण प्रत्येक वेळी उपसंचालकांकडून उडवा उडविची उत्तरे देण्यात येत होती. तसेच मुद्दामहून खात्यात फेरफटका मारण्यास भाग पाडण्यात येत होते. त्यामुळे आमचा नाईलाज झाला व आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या दारी जावे लागले, असे फर्नांडिस यांनी सांगितले.
निवारा केंद्र चालविण्यासाठी अनुदानाची खूप गरज असते, कारण केंद्रात असलेले सदस्य हे म्हातारे, किंवा दिव्यांग असतात. त्यांची काळजी घेणे, हे सोपे काम नाही, तरीही आम्ही पूर्ण निष्ठेने ही निवारा केंद्रे चालविण्याचा प्रयत्न करत आहोत, पण महिला व बाल कल्याण खात्याने ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे, असेही फर्नांडीस यांनी यावेळी सांगितले.