वास्को: साडे तीन महीन्यानंतर बुधवारी (दि.१६) दुपारी पुन्हा एकदा वास्को रेल्वे स्थानकावरून ‘गोवा एक्सप्रेस’ रेल्वे १४ प्रवाशांना घेऊन दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाली. लॉकडाऊननंतर १ जून पासून वास्को रेल्वे स्थानकावरून ‘गोवा एक्सप्रेस’ रेल्वे (सद्या ही विशेष गाडी आहे) दिल्लीला जाण्यासाठी सुरू झाली होती, मात्र त्याच दिवसापासून मांगोरहील - वास्को येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळण्यास सुरू झाल्याने ४ जून पासून सुरक्षेच्या दृष्टीने या रेल्वेचा गोव्यातील शेवटचा थांबा मडगाव रेल्वे स्थानक पर्यंत करण्यात आला होता. पुन्हा एकदा दिल्लीहून वास्को रेल्वे स्थानकापर्यंत येण्यासाठी बुधवारी निघालेली रेल्वे १८ सप्टेंबर रोजी वास्कोत पोचणार असून आतापासून वास्को - दिल्ली व दिल्ली - वास्को यामार्गावरील ‘गोवा एक्सप्रेस’ रेल्वे दररोज वास्कोतून धावणार असल्याची माहीती वास्को रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक रामदास गुड्डेमणी यांनी दिली.
बुधवारी दुपारी ३ वाजता वास्को रेल्वे स्थानकावर ‘गोवा एक्सप्रेस’ रेल्वे (०२७७) हिरवा झेंडा दाखविल्यानंतर साडेतीन महीन्यानंतर पुन्हा एकदा ही रेल्वे वास्कोतून हजरत निझामुद्दीन, दिल्ली रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी निघाली. या रेल्वेतून बुधवारी वास्को रेल्वे स्थानकावरून विविध ठीकाणी जाण्यासाठी १४ प्रवाशी गेल्याची माहीती वास्को रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक रामदास गुड्डेमणी यांनी दिली. दिल्लीला जाणार असलेल्या या रेल्वेतून मडगाव रेल्वे स्थानकावरून विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी २४५ प्रवाशी निघालेले असल्याची माहीती रामदास यांनी पुढे देऊन ही रेल्वे आता दररोजी दुपारी ३ वाजता वास्को रेल्वे स्थानकावरून दिल्लीला जाण्यासाठी निघणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बुधवारी दिल्लीहून वास्को रेल्वे स्थानकावर येण्यासाठी ‘गोवा एक्सप्रेस’ रेल्वे (०२७८) निघालेली असून १८ सप्टेंबर रोजी ती साडेतीन महीन्यानंतर पुन्हा एकदा प्रवाशांना घेऊन वास्कोत आगमन होणार असल्याचे रामदास यांनी सांगितले. यानंतर दिल्लीहून प्रत्येक दिवशी प्रवाशांना घेऊन ‘गोवा एक्सप्रेस’ रेल्वेचे वास्कोत आगमन होणार आहे.
लॉकडाऊननंतर १ जून पासून वास्को रेल्वे स्थानकावरून ‘गोवा एक्सप्रेस’ रेल्वे दिल्लीला जाण्यासाठी तसेच दिल्लीहून वास्कोला येण्यासाठी सुरू झाली होती, मात्र त्याच दिवसापासून मांगोरहील - वास्को येथून कोरोनाबाधित रुग्ण आढळण्यास सुरू झाले. यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने गोव्यात येणाºया या ‘गोवा एक्सप्रेस’ रेल्वेचा शेवटचा थांबा मडगाव रेल्वे स्थानक पर्यंतच करून (मागच्या साडेतीन महीन्यापासून ही रेल्वे गोव्याच्या मडगाव रेल्वे स्थानकापर्यंत यायची व मडगावहून दिल्लीला जाण्यासाठी निघायची) ही रेल्वे वास्को रेल्वे स्थानकावर येण्यापासून बंद केली होती. साडेतीन महीन्यानंतर पुन्हा एकदा ‘गोवा एक्सप्रेस’ रेल्वेची सुरवात वास्को रेल्वे स्थानकावरून करण्यात आल्याने अनेकांनी याबाबत आनंद व्यक्त केला.