शुक्रवारी दुपारी ढवळी येथील स्क्रॅपयार्डला लागलेली आग शनिवारी रात्री उशिरा आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले असून अग्निशामक दलाने केलेल्या कामाचे कौतुक नागरिक करत आहेत. जरी आग आटोक्यात आली असली तरी सुरक्षेच्या कारणास्तव दोन बंब मात्र घटनास्थळी अजून ठेवण्यात आले असल्याची माहिती फोंडा अग्निशामक दलाचे अधिकारी सुशील मोरजकर यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्तानुसार ढवळी येथील स्क्रॅप ला शुक्रवारी अचानक आग लागली. स्क्रॅपमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक पदार्थ असलेले बॅरल्स वगैरे तत्सम वस्तू असल्याने, तसेच दुपारची वेळ असल्याने आगीने लगेचच रौद्ररूप घेतले व संपूर्ण स्क्रॅपयार्ड आगीच्या विळख्यात सापडले. सदरची आग शमवण्यासाठी गोव्यातील सगळ्या अग्निशामक दलाचे बंब वापरण्यात आले. हायड्रोलिक क्रेनचा सुद्धा वापर करण्यात आला.
लाखो लिटर पाणी लागले
आग एवढी मोठी होती की तिथे दाखल झालेले पाण्याचे प्रत्येक बंब कमी पडू लागले होते. अग्निशामक दलाचे बंब सातत्याने ढवळीच्या दिशेने कुच करत असल्याचे चित्र त्यादिवशी दिसले. 13 बंब पहिल्याच दिवशी वापरण्यात आले होते. त्याबरोबर शेकडो लेटर फॉम सुद्धा वापरण्यात आला. हायड्रोलिक क्रेनच्या सहाय्याने सुद्धा आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न झाले. शनिवारी दिवसभर बुलडोझरच्या सहाय्याने पत्रे हटवून आग लागू नये म्हणून अग्निशामक दलाने प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना शनिवारी रात्री उशिरा यश आले व आग आटोक्यात आणण्यात आले. काही ठिकाणी अजूनही सुप्त प्रमाणात आग दुमसत असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु आग्निशामक दलाचे जवान परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.
असे अधिकारी हवेत
ज्यावेळी सदर स्क्रॅप यार्डला आग लागली त्यावेळी आग चारीही बाजूने पटत होती. चारही बाजूने अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. पेट्रोल पंचा सहाय्याने पेट्रोल पंपच्या बाजूला आग पसरू नये म्हणून जवानाची एक तुकडी खास लक्ष ठेवून होती. ह्या तुकडीचे नेतृत्व फोंडा कार्यालयाचे अधिकारी सुशील मोरजकर हे करत होते. ह्या युवा अधिकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कारण आपल्या जवानांना पुढे न करता धोकादायक ठिकाणी जीवाची पर्वा न करता सुशील वर चढलेला लोकांनी पाहिला. तिथे आत सिलेंडर होते, त्याच बरोबर लहान मोठे स्फोट होत होते. एखादा लहानसा स्फोट झाला असता तर ज्या भिंतीच्या सहाय्याने सुशील मोरजकर उभे होते ती भिंत त्यांना घेऊन पडू शकली असती. परंतु जीवाची पर्वा न करता सुशील,आगीला सहाय्य करणारे प्लास्टिकचे लहान पाईपचे तुकडे काढण्यात मग्न झाला होता. त्याच्या खाली त्याचे जवान पाण्याचा फवारा मारून त्याला तेवढेच सहकार्य करत राहिले. थोडक्यात जवानांना पुढे न करता स्वतः सर्वात पुढे राहून काम करणारा अधिकारी मिळणे विरळच. लोकमत च्या कॅमेर्यात त्याचे हे धाडस टिपले गेले आहे.