म्हापसा : इस्त्राईल देशातील ग्रीन २००० या कंपनीच्या सहयोगाने उच्च तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्कृष्ठ असे सेंद्रीय कृषी केंद्र कोडार येथील फार्मवर सुरु करण्यात येणार आहे. पुढील वर्षी सुरु होणा-या या केंद्रातून सेंद्रीय पद्धतीने शेती कशा प्रकारे करावी याची प्रत्यक्षदर्शी माहिती शेतक-यांना तेथील फार्मवरुन देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी दिली. म्हापसा येथील धुळेर नजिक कृषी फार्मवर गोवा कृषी क्रांती प्रदर्शन व शेतक-यांसाठीच्या प्रशिक्षण सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी सरदेसाई बोलत होते.
तीन दिवशीय प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, कृषी मंत्री विजय सरदेसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर, उपसभापती मायकल लोबो, माजी उपमुख्यमंत्री अॅड. दयानंद नार्वेकर, भारतीय कृषी संशोधन केंद्राचे संचालक एकनाथ चाकुडकर, कृषी संचालक माधव केळकर, आत्माचे प्रकल्प अधिकारी संजीव मयेकर, कृषी विभागीय अधिकारी रघुनाथ जोशी उपस्थित होते. कृषी तांत्रिक व्यवस्थापन एजन्सी (आत्मा), कृषी खाते, नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोडार फार्मवर सेंद्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी इस्त्राईल देशाच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे सरदेसाई म्हणाले. त्यासाठी त्या कंपनी सोबत करार करण्यात आला असून या योजनेवर सुमारे ६ कोटी रुपये खर्च अपेक्षीत असल्याची माहिती यावेली दिली. भारत सरकारने सुद्धा संबंधीत कंपनीच्या सहकार्याने काम केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्राईल देशच्या दौ-यावर असताना त्यांनी पाहणी सुद्धा केली होती अशी माहिती सरदेसाई यांनी दिली. या कंपनीने राज्य सरकार समोर सादरीकरण सुद्धा केले होते. केलेले सादरीकरण आता प्रत्यक्षात दाखवून दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.
राज्यात हवामानाच्या सुक्ष्म अभ्यासाची गरज त्यांनी व्यक्त केली. हा अभ्यास केल्यानंतर शेतक-यांनी कुठल्या ठिकाणी कशा प्रकारची लागवड घेणे शक्य होईल याची माहिती दिली जाणार असल्याचे ते म्हणाले. कृषी खात्याकडून समुदायीक शेतीचा प्रयोग यशस्वीरित्या करण्यात आला असून कंत्राट शेतींना उत्तेजन देम्यासाठी लवकरच कायद्यात बदल केले जाणार असल्याचे कृषी क्षेत्रात गोवा हे आदर्श राज्य करण्याची गरज तसेच इतर राज्यांना आदर्श घालून देण्याची गरज सरदेसाई यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. त्यासाठी गोव्यातील हिरवळ राखून ठेवणे गरजेचे आहे. हिरवळ राखून ठेवण्यासाठी शेतक-यांनी संघटित होवून कृषी क्षेत्राला उत्तेजन देण्याची गरज असून त्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी इतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.