पणजी : गोव्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय निरीक्षक, राज्यसभा खासदार रजनी पाटील बुधवारी दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर दाखल झाल्या. म्हापसा व पणजी येथे त्यांनी पराभूत उमेदवारांकडून अपयशाची कारणे जाणून घेतली.श्रीमती पाटील पक्षाच्या निवडून आलेल्या काही आमदारांनाही भेटल्या. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेतल्या.गोव्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ४० पैकी काँग्रेसने गोवा फॉरवर्ड बरोबर युती करुन स्वत: ३७ जागा लढविल्या होत्या तर, गोवा फॉरवर्डने ३ जागा लढविल्या होत्या. काँग्रेसला ११ तर, फॉरवर्डला केवळ १ जागा मिळाली. या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा राजीनामा घेऊन पायउतार व्हायला लावले.उमेदवारांच्या पराभवासाठी काही मतदारसंघात रचले कट कारस्थान मत विभागणीमुळेच काँग्रेसचा पराभव झाल्याचे श्रीमती पाटील यांनी या प्रतिनिधीला सांगितले. त्या म्हणाल्या की, आप, तृणमूल तसेच इतर पक्षांमध्ये धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी झाली. पराभवामागची कारणे आपण चर्चेदरम्यान जाणून घेतल्याचे त्या म्हणाल्या. काँग्रेस उमेदवारांच्या पराभवासाठी काही मतदार संघात कट कारस्थान रचण्यात आले. काही मतदार संघात मतांची विभागणी झाली तर भाजपाची मते एकसंध राहिल्याने पराभव झाल्याचे पाटील म्हणाल्या.लवकरच होणाऱ्या पंचायतीच्या निवडणुकीत पक्ष पूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरणार आहे. बूथ संघटना तसेच इतर विविध संघटनांकडून त्यासाठी सहकार्य घेतले जाणार आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा पक्ष बाळगत असल्याचे पाटील यांनी सांगितले. हा अहवाल केंद्रातील वरिष्ठ नेत्यांना सादर केला जाणार असून त्यानंतर लवकरच प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाणार आहे.दरम्यान, यावेळी आमदार मायकल लोबो यांनी पक्षाने तळागाळात जाऊन लोकांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करण्याची क्षमता असलेल्या नेत्याची प्रदेशाध्यक्ष पदावर नेमणूक होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
गोवा : काँग्रेस पराभवाचा निरीक्षक रजनी पाटील यांनी केला पंचनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 7:33 AM