पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे घरात व्हिलचेअरवर बसलेले असतात पण ते त्यांच्या कामाविषयी सतर्क आहेत. ते घरातूनच शासकीय काम करतात. शनिवारी सायंकाळी साडेतीन वाजता मुख्यमंत्री प्रथमच भाजपाच्या सर्व आमदारांची करंजाळे येथील त्यांच्या खासगी निवासस्थानी बैठक घेणार आहेत.
पर्रीकर व्हीलचेअरवर असले तरी घरात ते फिरू शकतात पण घराबाहेर पडणे त्यांना तूर्त शक्य नाही. त्यामुळे ते पर्वरीतील सचिवालयातही येऊ शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी उपेंद्र जोशी हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असतात. शिवाय एक अटेंडंट व एक नर्स असते, असे मुख्यमंत्र्यांना गेल्या काही दिवसांत प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तींनी लोकमतला सांगितले. पर्रीकर यांना कोणती फाईल निकालात काढायची आहे व कोणत्या फाईलवर काय निर्णय घ्यायचा आहे ते ठाऊक असते. बोलताना त्यांची विनोद बुद्धीही डोके वर काढते. ते काहीवेळा ज्योक्सही करतात आणि टीव्हीही अनेकदा पाहतात. पर्रीकर शरीराने थकलेले असल्याने फाईलवरील त्यांची सही वेगळी भासते.
मुख्यमंत्री गेल्या आठवड्यात म्हणजे इफ्फी संपल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेऊ पाहत होते. मात्र त्यांना ती घेता आली नाही. एक मंत्री विदेशात असल्याने मंत्रिमंडळ बैठक घेतली गेली नाही, असे सांगितले जाते. भाजापच्या सर्व आमदारांना पर्रीकर अलिकडे आपल्या खासगी निवासस्थानी भेटले नव्हते. शनिवारी आमदारांना बोलविण्यात आले आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री अनेक सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतील. प्रशासन ठप्प झाल्याची टीका काही मंत्री, आमदार सातत्याने करत असल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठका होत आहेत.
मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांपूर्वी मंत्री विजय सरदेसाई भेटले. तासभर सरदेसाई मुख्यमंत्र्यांशी बोलले. सरदेसाई यांनी लोकमतला सांगितले, की आपण भेटलो तेव्हा पर्रीकर टीव्हीवर इंग्रजी सिनेमा पाहत होते. काही प्रशासकीय कामांविषयी मी पर्रीकरांशी बोललो. ते मला बौद्धीकदृष्टय़ा तरी चांगल्या स्थितीत दिसले. ते घरातूनच काम करत असल्याने विद्यमान मुख्यमंत्री बदलला जावा ही मागणी मला योग्य वाटत नाही. मुख्यमंत्री बदलाचा प्रश्न येत नाही. माझा पक्ष तरी दुस:या कोणत्या पक्षासोबत जाणार नाही, कारण पर्रीकर घरातून काम करतात.