लोकमत न्यूज नेटवर्क मडकई: राज्यातील डबल इंजिन सरकार हे राज्यातील जनतेचे राहणीमान सुलभ होण्यासाठी रात्रंदिवस काम करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. मगो पक्ष हा एनडीएमधील घटक पक्ष आहे. 'सबका साथ, सबका विकास' यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मडकई येथील पंचायत सभागृहात कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री बोलत होते. या सभेला मगो पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा उपस्थित होते. मगो पक्षाच्या कार्यकर्त्यांना या सभेनिमित आपण पहिल्यांदाच मार्गदर्शन केले. याचा आपल्याला फार आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील भाजप सरकार हे डबल इंजिन सरकार आहे. गोव्याच्या विकासाच्या दृष्टीने ते काम करीत आहे. यात विशेष करून येथील लोकांचे राहणीमान चांगले व्हावे, सुलभ व्हावे, त्यादृष्टीने हे सरकार काम करीत आहेत. या भागातील वीजपुरवठा सुरळीत व्हावा, लोकांना त्रास होऊ नये त्यादृष्टीने विशेष प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वीजमंत्री सुदिन ढवळीकर, माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत, भाजपच्या दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार पल्लवी धेपे, 'मगो'चे अध्यक्ष दीपक ढवळीकर, माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, तसेच भाजप व मगो कार्यकर्ता या सभेला उपस्थित होते.