समीर नाईक, पणजी: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत चिखली, वास्को येथे सुरु असलेल्या स्क्वॉश क्रीडा प्रकारात महिलांच्या गटात गोव्याच्या आकांक्षा साळुंके हिने रविवारी सुवर्ण पदक मिळविले आहे. अंतिम लढतीत आकांक्षाने तामिळनाडूच्या पूजा आरतीचा ३-०अशा फरकाने परभव करत सुवर्ण पदक निश्चित केले.
उपांत्य लढतीत आकांक्षा साळुंकेने महाराष्ट्राच्या उर्वशी जोशी हिचा ११-७, ११–९, ११–१ असा सरळ पराभव केला होता. तामिळनाडूच्या पूजा आरतीने अंतिम फेरी गाठताना तामिळनाडूच्याच खेळाडूचा ११ ६, ११-८, ११-८ असा पराभव केला. आकांक्षाने मिळवलेल्या या पदकांच्या जोरावर गोव्याने आतापर्यंत ११ सुवर्ण पदक प्राप्त केली आहे, तर गोव्याची पदकांची एकूण संख्या ४९ झाली आहे. यामध्ये १२ रौप्य, व २६ कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील ही गोव्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
अनेक वर्षांपासून मी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तयारी करत होते, याचे फळ सुवर्ण पदकाच्या रुपाने मिळाले आहे. स्क्वॅशमधील हे पहिले पदक आहे. राज्यासाठी पदकतालिकेेत महत्वाचे योगदान देता आले, याचा अभिमान आहे. या पदक मिळविण्याच्या मागे अनेकांचा मोलाचा वाटा आहे. - आकांक्षा साळुंके