म्हापसा : रात्री-अपरात्रीपर्यंत पोटभर खाण्यासाठी खाद्य मिळणारे प्रसिद्ध असे अलंकार थियटराजवळील परिसरातील स्थळ गोवाभर प्रसिद्ध आहे. या स्थळावरील पदार्थ प्रसिद्ध असल्याने वाटसरू सुद्धा न चुकता येथील पदार्थाची चव चाखण्यासाठी येतात. इतरांप्रमाणे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांना सुद्धा हे स्थळ भावले होते. क्षणभराचा विसावा घेण्यासाठी आपल्या मित्रांसोबत ते सुद्धा तेथील पदार्थाचा आनंद लुटण्यासाठी अनेकदा येत होते. खाद्य पदार्थासाठी पर्रीकरांच्या आवडीच्या स्थळातील एक हे स्थळ होते.
संध्याकाळी पाचनंतर येथे सुरु होणारी दवदिवशीची लगबग रात्री उशीरापर्यंत सततची सुरुच असते. चिकनपासून बनवलेल्या विविध पदार्थात चायनीज तसेच भारतीय पदार्थासोबत, चिकन शाकूती, रस्सा आॅमलेट, वडा-पाव, पाव-भजी, ज्युस असे विविध प्रकारचे पदार्थ इथे उपलब्ध असतात. लोकांची गर्दी सुद्धा या परिसरात रात्रीपर्यंत सुरुच असते. आपल्या मनपसंतीच्या गाड्यासमोर बसून अनेकजण खाताना दिसून येतात.
येथील व्यवसायीकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री ८ नंतर अनेकदा पर्रीकर तेथे येत असत. दिवसभराच्या कामाचा थकवा घालवण्यासाठी ते तेथे येवून क्षणभराच्या विश्रांती बरोबर एखादा पदार्थ घेवून त्यावर ताव मारीत. त्यांचा खाण्याचा पदार्थ ठरलेला नसायचा; पण जो पदार्थ ते मागवत तो आवडीने खात. घेतलेला पदार्थ संपल्यानंतर कधीतरी काजूचे गर, फू्रट सॅलाड ज्युस सुद्धा त्यांना आवडायचा. कधीतरी विशिष्ठ फळांची मागणी सुद्धा त्यांच्याकडून केली जायची. एकदा बसले की किमान तास अर्धा तास तरी ते उठत नसे. तेथे त्यांच्या सोबत आलेल्या त्यांच्या इतर मित्रां सोबत चर्चा रंगलेली असायची. होणारी चर्चा राजकीय सोडून इतर विविध क्षेत्रातील असायची. चर्चेचा विषय रंगला की वेळेचे भान त्यांना नसायचे.
परिसराला लागून असलेल्या प्रशांत हॉटेलात प्रवेश करुन तेथे बनणारी बिया भाजी किंवा कालवांचे तोणाक तर त्यांच्या मनपसंतीचे होते. बिया भाजीत बिया किंवा कालवांच्या तोणाकात त्यांना कावले दिसली नाही तर मालकाला हळूवारपणे चिमटा सुद्धा काढून प्रकार नजरेला आणून द्यायचे. त्याच्यासोबत ताजे पाव सुद्धा हवे होते.
हॉटेलचे मालक सुद्धा पर्रीकर येणार म्हणून रात्रीपर्यंत थोडे तरी त्यांच्यासाठी शिल्लक ठेवायचे. फार भूक लागली असेल तरी तळलेल्या मिरच्याची मागणी त्यांच्याकडून केली जायची. बहुतेकवेळा त्यांना साखर नसलेला चहा आवडायचा किंवा बिन दूधाचा चहा सुद्धा ते मागवायचे. हॉटेलचे मालक मोहन तळावलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पदार्थ खाल्ल्यानंतर त्या दिवशीची चव कशी होती याचा मुद्दामहून उल्लेख पर्रीकरांकडून केला जायचा. काहीवेळा थट्टा मस्करी करताना आजच्यापेक्षा कालची चव काही वेगळीच होती असे मिश्कीलपणे सांगायचे. त्यांच्यासाठी एक वेटर दिला जायचा.
तळावलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील किमान ३० वर्षांपासून ते सततपणे यायचे. सुरुवातीला त्यांच्या येण्यात नियमीतपणा होता; पण कालांतराने त्यांच्या वाढत्या व्यापामूळे येण्याचे प्रकार कमी झाले. तरी फक्त वेळात वेळ काढून भूक लागल्यास वेळात वेळ काढून येवून एखादा पदार्थ खावून लवकर निघून जायचे. राजकारणात पूर्णपणे व्यस्थ झाल्यानंतर त्यांचे येण जवळ जवळ बंद झाले होते. तरी सुद्धा आले तर मध्यरात्रीनंतर लोकांची वर्दळ कमी झाल्यावर यायचे. जाताना कधीतरी बोलून जायचे बरी जाल्या भाजी आं. रविवारी त्यांचे निधन झाल्याचे कळताच अनेकांनी आपले व्यवसाय सुद्धा बंद ठेवले होते.