पणजी: गोवा जीएसबी स्पोर्टस् अँड चॅरिटेबल ट्रस्टने गोवा सारस्वत समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या आल्कॉन जीएसबी युनिटी चषक टी - २० क्रिकेट स्पर्धेच्या जर्सींचे तसेच विजेतेपदाच्या चषकाचे नुकतेच गोवा सारस्वत समाज अन्न महोत्सवात माजी मुख्यमंत्री व मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी नगरसेवक सगुण (दादा) नाईक, गोवा सारस्वत समाजाचे अध्यक्ष देश प्रभुदेसाई, गोवा महिला आयोगाच्या अध्यक्ष रंजिता पै, गोवा जीएसबी स्पोर्टस् अँड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धित पै रायतुरकर, सचिव वेंकट बिचे, स्पर्धा संयोजक सिद्धार्थ घाणेकर तसेच अन्य विश्वस्त कपिल बोरकर, कपिल आंगले, प्रणव बिचे, सचिन सरदेसाई, केतन कुंदे, विक्रम गायतोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा ८ मार्च रोजी सुरू होणार असून ५ मे रोजी समाप्त होईल. शनिवार व रविवारी पणजी जिमखाना मैदान, एमसीसी मडगाव व एसके मैदान मळकर्णे येथे सामने खेळविले जातील. राज्यातील जीएसबी समाजातील एकूण १२ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आल्कॉन समुहाचे आकाश खवंटे हे या स्पर्धेचे शीर्षक प्रायोजक आहेत तर कॉमनवेल्थ डेव्हलपर्सचे चिराग नाईक हे सहयोगी पुरस्कर्ते आहेत. डॅझर्टस् अँड मोरचे डॉ.सागर साळगावकर व मानस डेव्हलपर्सचे तन्मय खोलकर हे देखील सहयोगी पुरस्कर्ते आहेत.
श्यामराव बिल्डर्स यांनी या स्पर्धेसाठी फिरता चषक दान केला आहे. या स्पर्धेच्या चषक व जर्सी अनावरण प्रसंगी सिद्धित पै रायतुरकर यांनी सांगितले की, 'गोवा जीएसबी स्पोर्टस् अँड चॅरिटेबल ट्रस्ट' ही गोवा सारस्वत समाजाच्या भविष्यातील क्रीडा स्पर्धांसाठी अधिकृत ट्रस्ट असेल. याच ट्रस्टच्या झेंड्याखाली जीएसबी समाजाच्या विविध क्रीडा स्पर्धा होतील. ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांसाठी सामाजिक उपक्रम देखील भविष्यात राबवले जातील, असे सिद्धित पै रायतुरकर यांनी स्पष्ट केले.