लोकमत न्यूज नेटवर्क, मडगावः राज्यातील भ्रष्ट व अकार्यक्षम भाजप सरकार गोमंतकियांच्या आरोग्याबाबत गंभीर नाही, हे कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या उशिरा का होईना लक्षात आले, ही चांगली गोष्ट आहे. आता गोवा औद्योगिक महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या बदल्यात भाजप सरकारला दिलेला पाठिंबा त्यांनी त्वरित काढून घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस मोरेनो रिबेलो यांनी केली आहे.
कुडतरीचे अपक्ष आमदार रेजिनाल्ड लोरेन्स यांचे वक्तव्य म्हणजे केवळ प्रसिद्धी स्टंट आहे. कुठ्ठाळीच्या आमदाराने बैठक घेऊन सरकारचा पर्दाफाश केल्याने आपले अस्तित्व दाखविण्यासाठीच रेजिनाल्ड यांनी आता प्रतिक्रिया दिली. त्यांना खरोखरच जनतेच्या आरोग्याची चिंता असेल तर त्यांनी औद्योगिक महामंडळाचे अध्यक्षपद सोडले पाहिजे आणि खुर्चीपेक्षा त्यांना लोकांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याचे सिद्ध केले पाहिजे, असे उघड आव्हान त्यांनी दिले.
गोव्यातील पाण्याच्या टँकर्सचे नियंत्रण कोणते खाते करते, याची चार वेळा आमदार असलेल्यांना माहिती नसणे हे लज्जास्पद आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याचे टँकर्स आरोग्य खात्याकडे नोंदणीकृत आहेत का? असा प्रश्न त्यांनी विधानसभेत आरोग्य विभागाला विचारला होता आणि त्यांना नाही, असे उत्तर मिळाले होते, हे रेजिनाल्ड यांनीच उघड केले आहे, असे रिबेलो यांनी नमूद केले.
यावरून कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड अजूनही विधिमंडळ कामकाजात आणि प्रशासकीय ज्ञानात कच्चे आहेत, हे स्पष्ट होते. त्यांनी भाजपसोबत नेहमीच 'फिक्सर'ची भूमिका बजावली असून, कुडतरीच्या मतदारांसोबत 'व्हिक्टिम कार्ड' खेळले आहे. कुडतरीवासीयांना आता त्याचे खरे रंग कळले आहेत, असेही ते म्हणाले.
जबाबदारी झटकून हात वर
अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचे एक पुरस्कर्ते विश्वजित राणे यांच्याकडे ताबा असलेल्या अन्न व औषधी प्रशासन विभागाने पाण्याच्या टँकरवर देखरेख आणि नियंत्रणासाठी त्यांची जबाबदारी झटकून हात वर केले आहेत. गोव्यातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टँकर व्यवसायाचे नियमन, नियंत्रण आणि देखरेख करण्यासाठी सरकारने जलस्रोत, वाहतूक, पोलिस, आरोग्य तसेच अन्न व औषधी प्रशासन खात्यातील अधिकारी यांचा समावेश असलेली नोडल एजन्सी स्थापन करावी, अशी मागणी मोरेनो रिबेलो यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"