लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सर्व अकराही आयटीआय केंद्रांचा तब्बल २३५ कोटी रुपये खर्चुन कायापालट केला जाईल. तसेच येत्या १५ तारखेपासून आयटीआय केंद्रांमध्ये आदरातिथ्य अभ्यासक्रम सुरू केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की, टाटा उद्योगसमूहाने १६० कोटी रुपये देऊ केले आहेत. पैकी निम्मी रक्कम खर्चही केली असून, आयटीआय केंद्रांचा दर्जा सुधारण्याचे काम सुरू आहे. सरकार ७५ कोटी रुपये देणार आहे. 'आदरातिथ्य अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना सहा महिने आयटीआयमध्ये व सहा महिने ताज हॉटेलमध्ये प्रशिक्षण घ्यावे लागेल. पुढील दोन वर्षांत गोव्यात हॉटेल्स तसेच तत्सम सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा फायदाच होईल, असे मुख्यंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'सरकारचा अधिकाधिक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यावर भर आहे. त्याअनुषंगाने राज्यात विविध उपक्रम सुरू आहेत. इयत्ता दहावीनंतर विद्यार्थी या अभ्यासक्रमांचा लाभ घेऊ शकतात', असे मुख्यमंत्री म्हणाले.
येत्या सोमवारी जागतिक युवा कौशल्य दिन आहे; परंतु सोमवारपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होत असल्याने सरकारी पातळीवरील कार्यक्रम आज, गुरुवारी कला अकादमीमध्ये होणार आहेत.
या कार्यक्रमाला टाटा मोटर्स, ताज हॉटेल, तसेच अन्य बड्या कंपन्यांचे प्रतिनिधी, तसेच आयटीआय केंद्रांचे विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित राहणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा व करिअर घडवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.