किशोर कुबल, पणजी : पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा राज्यात १८ प्रकारच्या व्यावसायिकांना लाभ दिला जाणार असून पंधरा हजार रुपये किमतीचे टूल किट मोफत देऊ, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. व्यवसायासाठी प्रारंभी एक लाख रुपयांचे कर्ज तसेच मोफत प्रशिक्षणाची सोयही केली जाईल. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, येत्या २ ऑक्टोबर रोजी स्वयंपूर्ण गोवा संकल्पनेला चार वर्षे पूर्ण होतील; सोमवारी सर्व स्वयंपूर्ण मित्र पंचायतींमध्ये आढावा घेतील. विश्वकर्मा योजना देखील याच दिवशी सुरू केली जाईल.मुख्यमंत्री म्हणाले की, श्रमजीवघ कारागिरांना विश्वकर्मा योजनेतून केंद्राने एक उत्तम व्यासपीठ दिलेले आहे. सुरुवातीला १ लाख रुपये आणि वर्षभरानंतर अल्पव्याजी २ लाख रुपये कर्ज दिले जाईल. या कारागिरांची पोर्टल वर नोंदणी केली जाईल. ग्रामपंचायती ते खरेच कारागीर आहेत याची खातरजमा करून शिक्कामोर्तब करतील.'ते पुढे म्हणाले की,' प्रधानमंत्री जनविकास योजनाही गोव्यात मोठ्या प्रमाणावर राबवली जाईल. अल्पसंख्यांक वर्गाला या योजनेचा लाभ होणार असून सरकारने यासाठी आधीच सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केलेला आहे तो केंद्राकडे पाठविला जाईल. चतुर्थी ई बाजारात ८०० ऑर्डर्स आल्या अशी माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, या योजनेचे नामकरण आता 'स्वयंपूर्ण ई बाजार' असे केले जाईल. यात सर्व प्रकारच्या स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. १ ऑक्टोबर रोजी सर्व शासकीय कर्मचारी तसेच मंत्र्यांनी स्वच्छता कार्यक्रमात सहभागी व्हावे, किनारपट्टी भागातील पंचायतींनीही या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहेमुख्यमंत्री म्हणाले की, ' राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा केटरिंगमधील सर्व निविदा प्रक्रियेचे आम्ही योग्यरित्या पालन केलेले आहे. 'थॉमस कूक'ने यशस्वीपणे बोली लावली. काही राजकीय पक्षांनी बोली लावण्यापूर्वीच का बोलायला सुरुवात केली, हे मला माहीत नाही.दरम्यान, सावई वेरें व केरी भागातील शाळांमध्ये माध्यान्ह आहारात अळ्या सापडल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून कडक कारवाईचा दिला आहे.
आयआयटीसाठी जमीन निश्चित करण्याची प्रक्रिया चालू आहे. अजून अंतिम निर्णय झालेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नावर सांगितले. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगे येथे नवीन दहा लाख चौरस मीटर जागा शोधल्याचा दावा केला होता त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले. पत्रकार परिषदेस पर्यटन मंत्री रोहन खंवटे हेही उपस्थित होते