पणजी : गोव्यात मगो पक्षाच्या कार्यकारी समित्या, मतदारसंघ समित्या तसेच महिला, युवा व इतर आघाड्या विसर्जित करण्याचा निर्णय केंद्रीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
येत्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचा ठरावही घेण्यात आला तसेच नरेश सावळ यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.
समित्या विसर्जित केल्याने सर्व अधिकार आता केंद्रीय समितीकडे आले आहेत. केंद्रीय समितीचे सदस्य सोडून अन्य कोणीही सरकार किंवा सत्ताधारी आमदाराविरोधात बोलल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिला आहे.
ढवळीकर म्हणाले कि, ‘ या समित्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपला होता. तर काही समित्यांवरील पदाधिकारी पक्ष सोडून गेलेले आहेत. काहीजण हयात नाहीत. त्यामुळे समित्या निष्क्रीय बनल्या होत्या. नरेश सावळ हेही कार्यकारी समितीवर होते. सध्या या समित्या विसर्जित केल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा त्या नव्याने गठीत केल्या जातील.’
नरेश सावळ यांनी राजीनामा सादर करताना पक्ष नेतृत्त्वावर जो हल्लाबोल केला होता त्यावरही जोरदार चर्चा झाली. पत्रकारांनी विचारले असता ढवळीकर म्हणाले की, ‘सावळ यांनी स्वार्थासाठी पक्ष सोडलेला आहे. ते गेले म्हणून पक्षाला काहीच फरक पडणार नाही. मगोपमध्ये आजवर अनेकजण आले आणि गेले. काहीजणांनी पक्ष विलीनही करण्याचा प्रयत्न केला परंतु कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष टिकुन आहे.