पणजी : मार्च महिन्यात 16 तारखेपासून बंद होणाऱ्या खाणी सुरू राहाव्यात, या मागणीसाठी बुधवारी खाणव्याप्त तालुक्यांतील खाण अवलंबितांनी एकत्रित येऊन आझाद मैदानावरील जाहीर सभेने सरकारचे लक्ष वेधले. सर्वोच्च न्यायालयाने एक आठवडय़ापूर्वी दिलेल्या निवाडय़ानुसार राज्यातील 88 खाणी 15 मार्चपासून बंद होणार आहेत. त्यामुळे या खाणींवर अवलंबून असलेल्या बाजर, ट्रक, मशिनरीजचे मालक, कामगार यांच्या रोजीरोटीची प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी खाणीवर अवलंबून असणाऱ्या खाण व्याप्त तालुक्यांतील सर्व कामगारांसह त्या व्यवसायाशी निगडित लोकांनी आज येथील आझाद मैदानावर ‘पोटासाठी शेवटची हाक’ हे ब्रिद वाक्य घेऊन एकत्रित जमून आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आझाद मैदानावर सकाळी नऊ वाजल्यापासून लोक जमण्यास सुरुवात झाली. जाहीर सभेला पाठिंबा देण्यासाठी सरकार पक्षातील आमदार राजेश पाटणोकर, दीपक पावसकर आणि प्रसाद गावकर यांनी उपस्थिती लावून अवलंबितांच्याबरोबर मैदानावर ठाण मांडले. याप्रसंगी अखिल गोवा बार्ज मालक असोसिएशन, धारबांदोडा तालुका ट्रक मालक असोसिएशन, ऑल गोवा मशिनरीज ओनर असोसिएशन, ऑल गोवा बार्ज ओनर असोसिएशन यांच्या अध्यक्षांची उपस्थिती होती. त्याचबरोबर खाणव्याप्त भागातील सरपंच, पंच सदस्यांनीही या सभेस उपस्थिती लावली. याप्रसंगी पिसुर्ले येथील टॅक मालक देवानंद परब म्हणाले की, 16 मार्चपासून खाणीवर अवलंबून असणा:या लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. गोव्यात खाणींचा व्यवसाय मोठा आहे. इतर कोणतीही मोठी औद्योगिक वसाहत एवढी मोठी नाही. हा व्यवसाय बंद झाल्यास लोक आत्महत्या करणार नाहीत, तर त्या धक्क्यानेच जीव गमावतील. राज्य सरकारने हवे असल्यास कायद्यात बदल करावा, त्याचबरोबर खाणी कशा सुरू राहतील यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खाणींवर स्थानिकांबरोबरच इतर राज्यातील कामगारवर्गही मोठय़ा प्रमाणावर काम करीत असतो. या सभेला सर्व संघटनांनी आपापल्या कार्यक्षेत्रतील कामगारांनाही या सभेस आणण्यासाठी खासगी बसची किंवा इतर वाहनांची सोय केली आहे.
गोव्यातील खाण अवलंबितांची राजधानीत ‘पोटासाठी शेवटची हाक’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 11:32 AM