पणजी : गोव्यातील सगळ्या सरकारी खात्याकडून यापुढे प्लॅस्टिकचा वापर बंद केला जाईल असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी पणजीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जाहीर केले.
मुख्यमंत्री म्हणाले की प्लॅस्टिक कप, पिशव्या व अन्य प्लॅस्टिकचा वापर थांबविण्याचे आपण सरकारी खात्यांना सांगितले आहे. एकदम शंभर टक्के वापर बंद होणार नाही. त्यामुळे सध्या सक्ती करत नाही पण प्लॅस्टिकचा वापर थांबविण्याचे ठरले आहे. येत्या मार्च 2018 पासून गोवा सरकारची खाती सर्व शुल्क, कर व अन्य महसुल हा डिजीटल पध्दतीनेच स्वीकारतील असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
गोवा हे विशेष मुले आणि विशेष व्यक्तींसाठी मैत्रीपूर्ण राज्य केले जाईल. येत्या महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात आपण विशेष व्यक्तींचे पालक आणि एनजीओ यांची बैठक घेईन. त्यांच्या समस्या आणि गरजा आपण समजून घेईन व त्यानुसार पाऊले उचलली जातील. आॅटिजमसारख्या व्याधी असलेल्या व्यक्ती व त्यांचे पालक याना दिलासा दिला जाईल. गोवा हे देशातील पहिले असे राज्य केले जाईल जे विशेष व्यक्तींसाठी मैत्रीपूर्ण असेल असे मुख्यमंत्री म्हणाले.
विशेष विद्यालयाना साधनसुविधा पुरविण्यासाठी अनुदान व कर्ज देणारी योजना मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुर केली. गोव्यात विशेष मुलांसाठी एकूण 22 विद्यालये आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.