पणजी - गोव्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये या महिन्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे फोटो लावले जाणार आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व खाते प्रमुखांना तशी सूचना केली आहे. गोव्यातील सरकारी कार्यालयांमध्ये आतापर्यंत फक्त स्व. राजीव गांधी, स्व. इंदिरा गांधी, महात्मा गांधी फोटो असायचे. आता विद्यमान पंतप्रधान मोदी व राष्ट्रपती यांचेही फोटो लागतील. अगोदर ज्या नेत्यांचे फोटो लावले आहेत ते काढले जाणार नाहीत. माहिती खाते सर्व खाते प्रमुखांकडे पंतप्रधान व राष्ट्रपतींचे फोटो देणार आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व खाते प्रमुखांना स्वच्छ भारत अभियान गंभीरपणे राबविण्याची सूचनाही केली आहे. सर्व सरकारी कार्यालयांत स्वच्छता मोहीम राबवावी व प्लास्टिक ग्लास व प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करावा अशीही सूचना मुख्यमंत्री पर्रीकर यांनी खाते प्रमुखांना केली आहे.
दरम्यान गोव्यात नुकतेच ऑनलाइन पद्धतीने लोकांना तक्रारी सादर करता यावे म्हणून सरकारने अॅप सुरू केले आहे. त्याद्वारे लोकांच्या समस्या ऑनलाइन पद्धतीने सरकारी खात्यांकडे येत आहेत. या तक्रारींची दखल घेऊन त्यांना वेळेत प्रतिसाद दिला जावा अशीही सूचना मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सर्व खाते प्रमुखांना केली आहे. प्रशासन अधिक संवेदनशील बनण्याची गरज आहे अशा अपेक्षा लोक व्यक्त करतात. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी लोकांना वेळेत सेवा द्या व लोकांची कामे ठरलेल्या वेळेत करा अशी सूचना खाते प्रमुखांना केली आहे.