पणजी : आशियातील सर्वात जुने मेडिकल कॉलेज असा मान असलेल्या गोवा मेडिकल कॉलेजबरोबरच आता ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ आयुर्वेद, योग अॅण्ड नॅच्युरोपॅथीचे २५0 खाटांचे रुग्णालय धारगळ येथे बांधण्यात येणार आहे. या रुग्णालयाची पायाभरणी येत्या १३ रोजी होणार आहे.
केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३0१ कोटी रुपये खर्चून हे रुग्णालय बांधण्यात येणार आहे आणि येथे दरवर्षी ५00 विद्यार्थ्यांना आयुर्वेद, नॅच्युरोपॅथीचे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच पीएचडी करता येईल. आयुर्वेद आणि नॅच्युरोपॅथी उपचारांची मोठी सोय रुग्णालयाच्या माध्यमातून गोव्यात होणार आहे. तसेच सर्वसामान्य जनतेबरोबरच, विद्यार्थी, संशोधक यांना हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. आयुर्वेद विभागासाठी १00 खाटा तर नॅच्युरोपॅथीसाठी १00 खाटांचे रुग्णालय असेल. मधुमेहींसाठी डायबेटिक क्लिनिक, ह्दयरोग विभाग यासह ३0 रुग्णांसाठी योगा थिएरपीची व्यवस्था असेल.
आयुर्वेद मेडिकल कॉलेजसाठी हॉस्टेलचीही सोय असणार आहे. डॉक्टरांसाठी ६७ खोल्या आणि १८२ विद्यार्थ्यांसाटी ९१ खोल्यांची सोय असेल. रुग्णालयात प्रशिक्षित डॉक्टर्स, परिचारिका तसेच अन्य कर्मचारी नियुक्त केले जातील. धारगळ येथे सुमारे २ लाख चौरस मिटर जमिनीत सर्वे जमिनीत हे रुग्णालय येत असून दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ आयुर्वेदचा हे रुग्णालय विस्तारित विभाग असेल. पायाभरणी समारंभाला राज्यपाल मृदुला सिन्हा,केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर, केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा व मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा उपस्थित राहतील.
१२ व १३ रोजी जागतिक योग परिषद
दरम्यान, येत्या १२ व १३ रोजी येथील कला अकादमी संकुलात जागतिक योग परिषदेचे आयोजन करण्यात आले असून ३0 ते ४0 राष्ट्रांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थिती लावणार आहेत, असे नाईक यांनी स्पष्ट केले. आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री. श्री. रविशंकर यांच्या हस्ते सकाळी १0 वाजता उद्घाटन होईल. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहतील शिवाय स्वत: नाईक हेही असतील. परिषदेचा समारोप १३ रोजी दुपारी ३ वाजता समारोप होणार असून राज्यपाल मृदुला सिन्हा प्रमुख पाहुण्या म्हणून तर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. सत्यपाल सिंह प्रमुख अतिथी, हैदराबदचे रामचंद्र मिशनचे अध्यक्ष कमलेश पटेल तसेच केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक उपस्थित राहणार आहेत.