लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रचार तसेच निवडणुकीसंबंधीचे धोरण ठरवण्यासाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या समन्वय समितीची बैठक काल झाली. यावेळी काँग्रेसमध्ये तसेच विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीतही सर्व काही आलबेल असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.
उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे काही नेते प्रचाराला आले नाहीत. गिरीश चोडणकर लोहिया मैदानावर आले; परंतु पत्रादेवीला आले नाहीत. त्यांना कोणी बोलावलेच नाही, याबद्दल विचारले असता पाटकर म्हणाले की, प्रसार माध्यमेच क्षुल्लक गोष्टींचा बाऊ करत आहेत. उत्तर गोव्यातील नेते पत्रादेवीला तर दक्षिणेतील नेते लोहिया मैदानावर आले होते. काँग्रेस व इंडिया आघाडीत ऑल इज वेल आहे. दोन्ही मतदारसंघांमध्ये घरोघर गाठीभेटी, जाहीर सभा, कोपरा बैठका याचे नियोजन केलेले असून गटही स्थापन केले आहेत. ते प्रत्येक जबाबदारी पार पाडतील, असेही पाटकर म्हणाले.
या बैठकीला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्डतर्फे सरचिटणीस दुगार्दास कामत, आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर, आमदार क्रूझ सिल्वा, राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, शिवसेना (उबाठा) गोवा प्रमुख जितेश कामत उपस्थित होते.