पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर शुक्रवारी अमेरिकेहून गोव्यात येत आहेत, अशी माहिती भाजपाचे आमदार नीलेश काब्राल यांनी मंगळवारी दिली. या पार्श्वभूमीवर आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना त्यांनी शुक्रवारी (15 जून) गोव्यात उपस्थित राहण्याची सूचना दिली आहे. यामुळे काही मंत्र्यांनी आपले गोव्याबाहेरील दौरे स्थगित केले आहेत.
16 मार्चपासून पर्रीकर अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत गेल्या तीन महिन्यांत गोव्यात मंत्रिमंडळाची एकही बैठक होऊ शकली नाही. काही प्रस्ताव तेवढे त्यांच्या अनुपस्थितीत मंत्रिमंडळाच्या सदस्यांमध्ये फिरवून संमत केले गेले. मुख्यमंत्री पर्रीकर हे 14 जूनला रात्री गोव्यात दाखल झाल्यानंतर 15 जूनला सकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेतील किंवा 15 जूनला सकाळी जर ते दाखल झाले तर संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी बहुतेक मंत्र्यांना फोन करून येत्या शुक्रवारी गोव्याबाहेर जाऊ नका, असा सल्ला दिला आहे. गोव्यातच राहण्याची सूचना मंत्र्यांना करून आपण मंत्रिमंडळाची 15 जूनला बैठक घेणार असल्याचीही कल्पना पर्रीकर यांनी मंत्र्यांना दिली आहे. दोन मंत्र्यांनी ही माहिती 'लोकमत'ला आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली.
पर्रीकर हे गोव्यात परतत असल्याने मंत्री व भाजपा आमदारांमध्ये उत्साहच आहे. पर्रीकर आल्यानंतर प्रशासन वेग घेईल, असे मंत्र्यांना वाटते. मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या तर काही महत्त्वाचे प्रस्तावदेखील संमत होऊ शकतील. मंत्रिमंडळातील एक मंत्री तिरुपतीला जाणार आहेत. मात्र पर्रीकरांनी मंत्रिमंडळ बैठक घेणार असल्याचे सांगितल्याने हे मंत्री 15 जूनऐवजी 14जून रोजी रात्रीच गोव्यात परततील. आणखी एक मंत्री दिल्लीची आपली भेट आटोपून तातडीने 14 जून रोजी रात्री येथे दाखल होत आहेत.
दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे पोतरुगालच्या दौ-यावर आहेत. त्यामुळे ते मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होऊ शकणार नाहीत. ते या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गोव्यात परततील, असे सूत्रांनी सांगितले. वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांना ब्रेन स्ट्रोक आलेला आहे. ते मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तेही बैठकीला येऊ शकणार नाहीत. मंत्रिमंडळ बैठकीसाठीची पूर्वतयारी सध्या मुख्य सचिव करत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.