लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : कोरोना महामारी काळात गोव्याच्या अर्थव्यवस्थेवर कुठलाही परिणाम झालेला नाही. उलट पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य आदी विविध क्षेत्रांत राज्याचा विकास सातत्याने होत आहे, असा मुद्दा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी काल नीती आयोगाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीवेळी मांडला, यावेळी गोव्याच्या विकासाची जंत्री त्यांनी वाचून दाखवली.
स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत महिला, युवकांचे सशक्तीकरण, कौशल्य विकासला प्राधान्य देत आहे. राज्यात इलेक्ट्रीक बसेसना चालना दिली जात आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनाला 'व्होकल फॉर लोकल' अंतर्गत बाजारपेठ मिळवून देण्यावर भर दिला जात आहे. कृषी खात्याने आतापर्यंत १७ हजार ५०६ शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड जारी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
येत्या दि. १९ डिसेंबरपर्यंत गोव्याला १०० टक्के साक्षर बनवले जाईल. त्यासाठी राबवले जात आहेत. मुलभूत शिक्षणापासून कोणीही वंचित राहून नये याबाबत सरकार गंभीर असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. प्राथमिक, माध्यमिक शाळेतील प्रवेश दर १०० टक्के आहे. मुलभूत शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये याची खात्री आम्ही करीत आहोत. उच्च शिक्षणात मुलींच्या संख्येत मुलांपेक्षा लक्षणीय वाढ झाली आहे. गोव्यात २ हजारांहून अधिक शैक्षणिक संस्था असून ३.८४ लाख विद्यार्थी प्राथमिक ते विद्यापीठापर्यंतचे शिक्षण घेताहेत असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेतली जात आहे. २०२३-२४ या वर्षात २.३७ लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्याची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ हजार ४३४ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना काही समस्या आढळून आल्याने त्यांना चष्याचे मोफत वाटप केले. गोवा सरकार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करीत आहे. या अंतर्गत पुढील वर्षभरात सर्व तालुक्यातील ५० शाळांमध्ये स्टेम लॅब सुरु केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोव्यातील नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा पुरवण्यावर सरकारचा भर आहे. सर्व नागरिकांना चांगल्या संधी देण्यावर भर देत २०४० पर्यंत खऱ्या अर्थाने नागरिक स्वयंपूर्ण बनतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यातील पर्यटन व्यवसाय बहरत आहे. २०२३-२४ या वर्षात राज्यात ८८.४६ लाख पर्यटक दाखल झाले. त्यापैकी ४.१४ पर्यटक हे विदेशी होते. पर्यटन वृध्दीसाठी विविध धोरण राबवले जात आहे. याशिवाय सांस्कृतिक व वारसा पर्यटन, आरोग्य पर्यटन याला चालना दिली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्याला ७५ टक्के रक्ताची गरज ही स्वेच्छा रक्तदानातून भागते. यात वाढ करुन ती ९० टक्क्यांवर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. स्वच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची संख्या वाढवण्यावरही भर असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
...म्हणून गोवा पोहोचला जागतिक नकाशावर
गोव्याचा प्रसिद्ध कार्निव्हल, शिगमोत्सव, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आणि दिव्यांग व्यक्तींसाठी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल ही काही अशी उदाहरणे आहेत ज्यामुळे गोव्याची जागतिक नकाशावर ओळख निर्माण झाली आहे. या कार्यक्रमांमुळे केवळ पर्यटकच आकर्षित होत नाहीत तर स्थानिक कलाकार, उद्योजकांना व्यासपीठ मिळत आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.
१.३७ लाख गृहआधाराचे लाभार्थी१० हजार ममता योजने अंतर्गत अर्थसहाय्य१० हजार दिव्यांग व्यक्तींना युनिक कार्ड२ लाख कुटुंब दीनदयाळ स्वास्थ सेवा योजनेचे लाभार्थी