पणजी : गोव्यात मान्सून लांबणीवर पडल्याने तसेच हवेत प्रचंड उष्मा वाढल्याने विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी उद्या शनिवारी १० रोजी सर्व प्राथमिक, माध्यमिक विद्यालये, हायर सेकंडरी बंद ठेवल्या जाणार आहेत.
शिक्षण खात्याने दुपारी यासंबंधीचे परिपत्रक जारी केले. खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार सर्व सरकारी अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक, मिडल स्कूल, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच विशेष मुलांसाठीच्या शाळा उद्या शनिवारी बंद राहतील. मान्सून लांबणीवर पडल्याने आम आदमी पक्ष तसेच अन्य विरोधी पक्षांनी पाऊस सुरू होईपर्यंत शाळा बंद ठेवण्याची मागणी केली होती.
शिक्षण संचालकांना या संदर्भात निवेदनेही सादर करण्यात आली होती. अनेक शाळांमध्ये पंखे तसेच अन्य सुविधा नाहीत. त्यामुळे उष्म्याने विद्यार्थी व शिक्षक हैराण झाले होते. पाऊस सुरू होईपर्यंत शाळा बंद ठेवा, अशी मागणी पालकांकडून केली जात होती.
दरम्यान, मान्सून काल गुरुवारी केरळात दाखल झाला असून येत्या १३ पर्यंत गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे. आणखी पाच दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे. त्या अनुषंगाने उद्या शनिवार सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शाळांना सलग सुट्टी असेल.