पणजी : सरकारने बुधवारी एका अत्यंत महत्त्वपूर्ण आदेशाद्वारे सेवेत २४ वर्षे पूर्ण केलेल्या सर्व शिक्षकांना ‘सिलेक्शन ग्रेड’ लागू केली आहे. म्हणजेच पहिली ते बारावीपर्यंतच्या सरकारी व शासकीय अनुदानित विद्यालयांमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांना दि. १ एप्रिल २०१४ पासून आता वेतनवाढ लागू झाली आहे. हजारो शिक्षकांना याचा लाभ होणार आहे. जे शिक्षक सेवेची १२ वर्षे पूर्ण करतात, त्यांना सिनियर ग्रेड लागू होते. मात्र, २४ वर्षे सेवेत पूर्ण झालेल्या सर्व शिक्षकांना ‘सिलेक्शन ग्रेड’ लागू होत नव्हती. पाच शिक्षकांनी जर सेवेत २४ वर्षे पूर्ण केली असतील, तर त्या पाचपैकी सर्वांत ज्येष्ठ अशा एकाच शिक्षकाला सिनियर ग्रेड लागू होऊन वेतनवाढ मिळत होती. यामुळे अनेक शिक्षक आपल्यावर अन्याय होत असल्याची तक्रार करत होते. २४ वर्षे पूर्ण करणाऱ्या सरकारी व अनुदानित विद्यालयांतील सर्व शिक्षकांना सिलेक्शन ग्रेड लागू करून वेतनवाढ देण्याची ग्वाही सरकारने गतवर्षी अर्थसंकल्पात दिली होती; पण त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. तथापि, अर्थ खात्याने या प्रस्तावास मंजुरी दिली व बुधवारी शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी परिपत्रक जारी करत शिक्षकांना खूषखबर दिली. चार ते पाच हजार शिक्षकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. एप्रिल २०१४ पासून म्हणजे गेल्या वर्षापासूनच ही वेतनवाढ लागू होईल, असे परिपत्रकात म्हटले असल्याचे संचालक भट यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (खास प्रतिनिधी)
सर्व ज्येष्ठ शिक्षकांना घसघशीत वेतनवाढ
By admin | Published: February 26, 2015 2:25 AM