पणजी : गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत समविचारी पक्षांशी युती करण्यास तृणमूल तयार असल्याचे पक्षाच्या सर्वेसर्वा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. त्या सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. गोमंतकीयांची सत्ता असावी, असेही त्या म्हणाल्या. गोव्यात भाजपची दादागिरी चालली आहे. भाजपवाले आज माझ्या पोस्टरचे विद्रुपीकरण करत आहेत; पण एक दिवस असा येईल की देशभरात जनताच भाजपचे विद्रुपीकरण करील. गोव्याच्या चेहऱ्यावर आम्हाला हास्य पाहायचे आहे. दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस यांनी ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जी केंद्रात क्रीडामंत्री असताना दिलेल्या सहकार्याचा त्यांनी उल्लेख केला. ४८ वर्षीय लिएंडर यांना पद्मश्री, पद्मभूषणने याआधी सन्मानित करण्यात आले आहे.
सुदिन, चर्चिल, रोहन ममता बॅनर्जींना भेटलेपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गोव्यात येताच राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर, पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर, अपक्ष आमदार रोहन खंवटे, राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव व त्यांची कन्या वालांका यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली.
सावंत म्हणाले...२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच सत्तेवर येणार असून काँग्रेसला विरोधात बसावे लागणार आहे. इतर पक्षांना गोव्यातील राजकारणात स्थान नसल्याचे विधान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.