लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काँग्रेस उमेदवार जाहीर करण्यास विलंब लावत असल्याने 'इंडिया' आघाडीतील मित्रपक्षांचा संयम सुटला. आप, गोवा फॉरवर्ड, उद्धवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षांच्या स्थानिक नेत्यांची रविवारी सायंकाळी बैठक झाली.
बैठक झाल्याच्या वृत्तास सूत्रांनी दुजोरा दिला. काँग्रेसने उमेदवारी जाहीर करण्यास वेळकाढू धोरण अवलंबिल्याने तसेच प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा फोनवर संपर्क होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. परंतु, भाजपविरोधात इंडिया अलायन्ससोबत एकत्र राहण्याचे ठरले, असे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसचे दक्षिण गोव्यातील नेते सावियो कुतिन्हो यांनी शनिवारीच पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून काँग्रेस उमेदवार जाहीर करण्यास विलंब लावत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पक्षाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये विलंबाबद्दल अस्वस्थता आहे.
दरम्यान, एका तिकिटोच्छुक ज्येष्ठ नेत्याने या विलंबाबद्दलही नाव उघड न करण्याच्या अटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपला याचा फायदा होत असल्याचे तो म्हणाला, पक्षाने संभ्रम ठेवू नये, लवकर उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
गेले तीन दिवस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष 'नॉट रिचेबल': पालेकरांची उद्विग्नता
रविवारी सकाळी विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीत घटक असलेल्या आपचे गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर यांनी उद्वेग व्यक्त करताना कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष गेले तीन दिवस 'नॉट रिचेबल' असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, 'काँग्रेस कधी उमेदवार जाहीर करणार हे जाणून घेण्यासाठी गेले तीन दिवस मी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, त्यांच्याशी संपर्क होत नाही.'
काँग्रेसने कोणीही उमेदवार दिला, तरी भाजपला फरक पडत नाही. असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. 'निवडणुका आल्या की पाच वर्षांनी काँग्रेसवाले जागे होतात. मते मागायला आमच्यासारखे ते घरोघरीही जाण्याची तसदी घेत नाहीत, असेही ते म्हणाले.
अस्वस्थता वाढतेय
उमेदवार अजून जाहीर न झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमधील अस्वस्थताही उफाळून आली. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील तिकिटाचे दावेदार विरियातो फर्नाडिस यांचे कार्यकर्ते रविवारी त्यांच्या घरासमोर जमले व काँग्रेसने विरियातो यांनाच तिकीट द्यावे, अशी मागणी केली.