पणजी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम यापुढे सरकारकडून राज्य सोहळा म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी पणजीत केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित पणजीतील आंबेडकर उद्यानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पर्वरी येथे आंबेडकर भवनासाठी जागा संपादीत केली असून वर्षभरात हे भवन उभारण्याचा प्रयत्न असेल. या भवनमध्ये विद्यार्थ्यांना राहण्यासाठी हॉस्टेलचीही सोय असेल. या भवनची पायाभरणी लवकरच करु अशी ग्वाही सुध्दा त्यांनी दिली.
मुख्यमंत्री डाॅ. सावंत म्हणाले,की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमितचे कार्यक्रम विविध संघटना आयोजित करीत आहेत. मात्र आता यापुढे गोवा सरकार हा कार्यक्रम राज्य सोहळा म्हणून साजरा करेल. पेडणे ते काणकोणपर्यंत डॉ. आंबेडकर यांचे विचार सरकार पुढे नेत आहेत. याचाच भाग म्हणून समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत राज्य सरकारकडून सरकारी योजना पोचवून त्याचा लाभ लोकांनी घ्यावा यासाठी प्रयत्न आहे. यात शिक्षण, नोकरी, शिष्यवृती,आरक्षणसहीत सामाजिक कल्याणकारी योजनांचा समावेश आहे. या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचवण्याचे काम स्वयंपूर्ण मित्र करीत असल्याचे त्यांनी सांगितले.