पणजी : राज्याच्या पर्यटन क्षेत्रातील अनेक महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पांच्या व पर्यटनविषयक सेवांच्या आरंभाची प्रतीक्षा आता संपली आहे. शनिवारी कोट्यवधी रुपये खर्चाचे व पर्यटकांना आकर्षित करू शकतील असे प्रकल्प मार्गी लागणार आहेत.पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ यांच्या प्रयत्नांमधून साकारलेले अनेक प्रकल्प आता प्रत्यक्षात आले आहेत. हॉट एअर बलुन सेवा सुरू होत असून शनिवारी सकाळी साडेसात वाजता या सेवेचे उद्घाटन केले जाणार आहे. पाण्यावर चालणारी वाहने गोव्यात पाहायला मिळतील, ही आता केवळ कल्पनाच राहिलेली नाही. केवळ कागदावरच ही योजना राहिलेली नाही, तर त्यास मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता पाटो येथे अशा वाहन सेवेचे उद्घाटन केले जाणार आहे.पाटो येथे भव्य पर्यटन भवन प्रकल्प साकारला आहे. त्या प्रकल्पात पर्यटन खाते, पर्यटन विकास महामंडळ यांची कार्यालये आहेच. शिवाय अनेक छोटे परिषद गृह, बैठकांच्या खोल्या आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचेही तिथे कार्यालय आहे. सकाळी साडेनऊ वाजता संरक्षणमंत्री पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, आमदार नीलेश काब्राल, सिद्धार्थ कुंकळयेकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे.मंत्री परुळेकर यांनी आपल्या साळगाव मतदारसंघात अनेक उपक्रम मार्गी लावले आहेत. सायंकाळी सात वाजता ओ कोकेरो सर्कल ते आम्रेकरनाथ देवस्थानपर्यंतच्या पदपथाचे उद्घाटन केले जाईल. साडेसात वाजता साळगाव-म्हापसा रस्त्याच्या सौंदर्यीकरणाचे उद्घाटन, तर पावणेआठ वाजता साळगाव सर्कलच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन केले जाणार आहे.(खास प्रतिनिधी)
महत्त्वाकांक्षी पर्यटन प्रकल्पांचा आज श्रीगणेशा
By admin | Published: May 09, 2015 2:23 AM