पणजी : राज्यात सरकारमध्ये नेतृत्व बदल होऊ शकतात, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत भाजपामध्ये फेरप्रवेश करू शकतात, भाजपाचे तीन आमदार फुटतील अशा प्रकारच्या अफवांमुळे गोवा राज्य गेले तीन दिवस ढवळून निघाले आहे. अशा अफवांना महत्त्व देणारी विधाने विविध आमदारांनी केल्यानंतर अमेरिकेत उपचार घेणारे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ही थोडे अस्वस्थ झाले. त्यामुळे त्यांनी नियोजित दिवसापूर्वी दोन दिवस आधीच गोव्यात येणे पसंत केले अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
कामत हे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणूनही यापूर्वी पाच वर्षे काम पाहिलेले आहे. आपल्या भाजपामधील फेरप्रवेशाविषयी अकारण अफवा सुरू आहेत. प्रत्यक्षात तसे काहीच नाही, मुद्दाम अफवा प्लांट करतेय असे कामत यांनी लोकमतला सांगितले. मात्र अफवा संपलेल्या नाहीत. भाजपाचे तीन आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत व ते फुटू पाहतात अशा अर्थाचे विधान काँग्रेसचे पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी बुधवारी सायंकाळी केले व भाजपमध्ये खळबळ उडवून दिली. तत्पूर्वी विधानसभा उपसभापती मायकल लोबो यांनी काँग्रेसचे तीन आमदार यापूर्वी मुख्यमंत्री पर्रीकर यांना भेटलेले आहेत व ते भाजपामध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत असे विधान करून अफवांना पुष्टी दिली.
भाजपाच्या कोअर टीमच्या काही सदस्यांना लोबो यांचे हे विधान आवडले नाही पण भाजपानेही दिगंबर कामत यांना आपल्या पक्षात प्रवेश देण्याचा प्रस्ताव मुळीच नाही असे अजून पक्षातर्फे अधिकृतरित्या जाहीर केलेले नाही. काही दिवसांपूर्वी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांना कामत येऊन भेटले. त्यामुळे अफवा सुरू झाल्या होत्या पण कामत हे मंत्री ढवळीकर यांच्याकडे मतदारसंघातील एका विकास कामाविषयी चर्चा करण्यासाठी आले होते, असे नंतर मगो पक्षाच्या काही नेत्यांनी स्पष्ट केले.
पर्रीकर हे अमेरिकेतून 8 सप्टेंबरला परततील असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी स्पष्ट केले होते. तथापि, पर्रीकर यांनी आधीच आपले वैद्यकीय उपचार आटोपून अमेरिकेचा निरोप घेतला आहे. पर्रीकर भारतात परतले आहेत. ते आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत गोव्यात दाखल होणार आहेत. अफवांचा परिणाम पर्रीकर यांच्यावर झाला व त्यामुळे ते गोव्यात तातडीने परतत आहेत असा समज लोकांचा झाला आहे. भाजपाचे काही आमदार सध्या खनिज खाणप्रश्न वगैरे लवकर सुटत नसल्याने अस्वस्थ आहेत. त्यामुळेही पर्रीकर तातडीने गोव्यात आले असे मानले जात आहे.