पणजी : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शनिवारी (9 फेब्रुवारी) सायंकाळी गोव्यात बुथस्तरीय कार्यकर्त्यांच्या संमेलनावेळी मार्गदर्शन करणार आहेत. त्या संमेलनाला विक्रमी संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील, असा विश्वास गोवा प्रदेश भाजपाचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला आहे.
शुक्रवारी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी बोलताना तानावडे म्हणाले की, आम्ही संमेलनाची तयारी पूर्ण केली आहे. प्रथमच बांबोळी येथील सॅगच्या अॅथलेटीक स्टेडियमवर भाजपाच्या हजारो कार्यकर्त्यांचे संमेलन होईल. संमेलनासाठी विविध व्यवस्था असतील. विक्रमी संख्येने कार्यकर्ते येतील याची काळजी घेतली जात आहे. कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊनही आम्ही जागृती केली आहे. शनिवारी होणारे संमेलन म्हणजे जाहीर सभा नव्हे. ते फक्त बुथस्तरावर जे कार्यकर्ते काम करतात, त्यांच्यासाठीचेच संमेलन आहे. 30 ते 35 हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील.
तानावडे म्हणाले, की सायंकाळी चार वाजता शहा यांचे आगमन होईल. शहा हे गोव्यात आल्यानंतर दोनापावल येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये जातील. तिथून ते संमेलनाच्या ठिकाणी येतील. भाजपाच्या निवडणूक संचलन समितीचीही शहा हे दोनापावल येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये बैठक घेतील. त्याच बैठकीवेळी ते भाजपाच्या आमदारांना भेटतील. भाजपाचे संमेलन हे लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी म्हणून आहे. कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य वाढविले जाईल. त्यांना संमेलनाद्वारे आणखी सक्रिय केले जाईल. शहा यांचा गोव्यात मुक्काम नसेल. पणजी शहरात ते येणार नाहीत. दाबोळी विमानतळ ते दोनापावल व बांबोळी आणि तिथून परत असा त्यांचा कार्यक्रम आहे. रात्री ते माघारी जातील. भाजपाला गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकायच्या आहेत. त्यादृष्टीने शहा मार्गदर्शन करतील. आमदारांची स्वतंत्र बैठक होणार नाही.