ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 3 - रा. स्व. संघाच्या गोव्यातील कार्यालयाला भेट देऊन संघ परिवारातील सर्व संघटनांच्या प्रमुखांशी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी संवाद साधला. गोव्यातील संघ कार्यालयाला भेट देणारे शहा हे गेल्या 30 वर्षांतील पहिले भाजप अध्यक्ष ठरले आहेत.
गोव्यातील रा.स्व. संघात गेल्यावर्षी फुट पडली व राष्ट्रीय स्तरावरही तो चर्चेचा विषय ठरला. संघचालक पदावरून सुभाष वेलिंगकर यांना हटविले गेले आणा आणि गोव्यातील भाजपला पर्याय म्हणून संघ स्वयंसेवकांनी नवा राजकीय पक्ष जन्माला घातला. गोव्यातील इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांचे अनुदान भाजप सरकार बंद करत नसल्याने वेलिंगकर आणि अन्य स्वयंसेवकांनी मिळून वेगळी चूल मांडली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर वेलिंगकर यांची टीका अजून सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर शहा यांनी रविवारी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासोबत पणजीतील संघ कार्यालयास भेट दिली. भाजप आणि संघ परिवारातील संघटना यांच्यात समन्वय रहावा या दृष्टिकोनातून शहा यांनी तिथे चर्चा केली. यावेळी नवे संघचालक नाना बेहरे, विहिंपसह संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रमुख तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर उपस्थित होते.