पणजी: मनोहर पर्रीकर यांच्याकडे राफेल डीलबद्दलची महत्त्वाची माहिती असल्यानं त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, असा खळबळजनक दावा काँग्रेसनं केला आहे. वादग्रस्त राफेल विमान खरेदी कराराबद्दल पर्रीकर यांच्याकडे अतिशय महत्त्वाची माहिती आहे. या माहितीच्या आधारे ते ब्लॅकमेल करु शकतात, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना वाटते. त्यामुळेच त्यांच्याकडून पर्रीकरांचा राजीनामा घेतला जात नाही, असा गंभीर आरोप गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे काही दिवसांपासून गोव्यात नेतृत्त्व बदलाची चर्चा होती. मात्र काल अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. पर्रीकरच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असं भाजपाकडून जाहीर करण्यात आलं. यानंतर काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी भाजपावर निशाणा साधला. राफेल डीलबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती बाहेर येऊ नये, यामुळेच मनोहर पर्रीकरांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवण्याचा निर्णय भाजपा नेतृत्त्वानं घेतला आहे, असा गंभीर आरोप चोडणकर यांनी केला. 'ज्यावेळी राफेल विमान खरेदीचा करार झाला, त्यावेळी मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्रीपदी होते. त्यामुळे त्यांच्याकडे या कराराबद्दलची महत्त्वाची माहिती आहे, असं मला वाटतं. या माहितीच्या आधारे त्यांच्याकडून ब्लॅकमेलिंग केलं जाऊ शकतं. त्यामुळेच मोदी-शहा त्यांना राजीनामा द्या, असं सांगण्याची हिंमत दाखवू शकत नाहीत,' असा गंभीर आणि खळबळजनक आरोप चोडणकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. राफेल विमान खरेदीत मोठा घोटाळा झाला असून त्यामध्ये मोदींचा सहभाग आहे, असाही दावा त्यांनी केला.
Rafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 10:31 AM