पणजी : गोवा भाजपकडून सक्रिय सदस्यांची नोंदणी कधी केली जाईल व सध्या प्राथमिक सदस्य नोंदणीचे काम कुठवर पोहचले आहे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने अमित शहा यांनी गुरुवारी जाणून घेतले.
गृह मंत्री शहा यांची दोनापावलच्या हॉटेलमध्ये प्रदेश भाजपच्या कोअर टीमने भेट घेतली. पंधरा मिनिटांचा वेळ शहा यांनी भाजपच्या पदाधिका:यांना दिला. गोवा भाजपला चार लाख सदस्य नोंदविण्याचे लक्ष्य ठरवून दिले गेले आहे. त्या कामाला गती देण्याच्या दृष्टीकोनातून शहा यांनी भाजपच्या कोअर टीमसोबत चर्चा केली. भाजपचे संघटनात्मक काम कसे चालले आहे, संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया कधी होईल वगैरे गोष्टी शहा यांनी जाणून घेतल्या.
शहा यांचे दाबोळी विमानतळावर स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, मंत्री मायकल लोबो, मंत्री माविन गुदिन्हो, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, दामू नाईक आदी गेले होते. दरम्यान, खनिज खाण व्यवसाय लवकर सुरू करण्याच्यादृष्टीने केंद्र सरकार पाऊले उचलील असेही शहा यांनी भाजपच्या कोअर टीमला सांगितल्याचे एका पदाधिका:याने स्पष्ट केले. पूरग्रस्त भागांमध्ये जी हानी झाली, ती भरून निघावी म्हणून केंद्र सरकार पाऊले उचलील अशी ग्वाही शहा यांनी दिल्याचे पदाधिका:याने सांगितले.
यानंतर दुपारी अडिच वाजता शहा दिल्लीला जाण्यासाठी निघाले. गृह मंत्री झाल्यानंतर शहा प्रथमच गोवा भेटीवर आले होते. अलिकडेच भाजपच्या सदस्य नोंदणी मोहीमेचे राष्ट्रीय प्रमुख तथा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान हेही गोव्यात येऊन गेले व त्यांनी भाजपच्या सदस्य नोंदणी मोहीमेला गती द्यावी अशी विनंती केली.