पणजी : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शनिवारी २0 रोजी एक दिवसाच्या गोवा भेटीवर येत असून बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. तसेच सायंकाळी निघण्यापूर्वी आमदार, पदाधिकाऱ्यांचीही बैठक घेतील. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा बिगुल खऱ्या अर्थाने याच बैठकीत वाजणार आहे. प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये अशाच बुथस्तरीय मेळाव्यांमधून भाजपने यश संपादन केले आहे. अमित शहा हे शनिवारी दुपारी १२.५0 वाजता दाबोळी विमानतळावर उतरतील. संध्याकाळी ४ ते ६.३0 या वेळेत बांबोळी येथे मुखर्जी स्टेडियमवर बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. सुमारे ९ हजार कार्यकर्त्यांनी यासाठी नोंदणी केलेली आहे. सायंकाळी ७.३0 वाजता आमदार व पदाधिकाऱ्यांना संबोधतील आणि त्याच दिवशी रात्री दिल्लीला रवाना होतील. दरम्यान, २२ रोजी तिरंगा यात्रेचा समारोप कार्यक्रम वास्को येथे आयोजित करण्यात आला असून केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी येथील आझाद मैदानावरील कार्यक्रमात ते उपस्थिती लावतील.
अमित शहा ठरवणार भाजपची दिशा
By admin | Published: August 19, 2016 2:04 AM