ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १२ - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सुभाष वेलिंगकर याना भेटायला हवे होते आणि परिस्थिती समजून घ्यायला हवी होती असे स्पष्ट शब्दात नाना बेहरे यांनी भाजपची चूक दाखवून दिली आहे. वेलिंगकर यांनी आपले १०० टक्के जीवन संघ कामासाठी दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एका इंग्रजी वृत्त संस्थेशी बोलताना बेहरे यांनी वेलिंगकर यांना संघचालक पदावरून कमी करण्याच्या घटनेमुळे आपल्याला दु:ख झाले असल्याचे सांगितले. निदर्शकांनी अमित शहा यांच्याविरोधात निदर्शने केली नव्हती. त्यांचा रोष होता गोवा भाजपवर. परंतु निदर्शकांना भेटून शहा यांनी माहिती घ्यायला हवी होती. वेलिंगकर यांनाही भेटायला हवे होते. त्यामुळे कधाचित संघ आणि भाजपमधील रुंदावलेली दरीही कमी झाली असती असे ते म्हणाले.
वेलिंगकर यांना संघचालक पदावरून कमी केल्यानंतर गोव्यातील संघाने कोंकण प्रांताशी फारकत घेतल्यानंतर गोवा विभागाचे संघचालक म्हणून बेहरे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. नवीन संघ आणि जुना संघ असे काहीच नाही. गोव्यात संघाचे काम करणारे सर्वच जण स्वयंसेवक आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. माद्यम प्रश्नी त्यांचा पाठिंबा चालू राहणार आहे आणि वेलिंगकर यांची भेटही ते घेणार आहेत असे त्यांनी सांगितले.