पणजी : काँग्रेस पक्ष अखेर फुटीच्या उंबरठय़ावर उभा असून काँग्रेसचे दोन आमदार सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतील. त्यानंतर आमदारकीचा राजीनामा सादर करतील. दोघेही आमदार तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, मंत्री विश्वजित राणे व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे दिल्लीत आहेत.
शिरोडकर हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षही आहेत. ते गेले दीड वर्ष भाजपाच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी त्यांचे चांगले नाते तयार झाले होते. मांद्रेचे आमदार सोपटे हे यापूर्वीच्या काळात भाजपामधून फुटून काँग्रेसमध्ये गेले होते. त्यावेळीही त्यांना मंत्री विश्वजित राणे यांनी भाजपामधून काँग्रेसमध्ये आणले होते, पण काँग्रेसच्या तिकीटावर नंतर त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. 2017 च्या निवडणुकीत सोपटे हे काँग्रेसच्या तिकीटावर मांद्रे मतदारसंघात जिंकले. तिथे त्यांनी ज्येष्ठ भाजपा नेते तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पराभूत केले होते. आता सोपटे व शिरोडकर या दोघांनाही भाजपामध्ये प्रवेश दिला जाईल व भाजपाचे तिकीटही दिले जाईल. प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर, मंत्री राणे आदींसोबत शिरोडकर व सोपटे हे अमित शहा यांना भेटतील व मग काँग्रेसमधील फुट अधिकृतरित्या जाहीर केली जाईल, असे सुत्रांनी सांगितले.
दरम्यान, मंत्री विश्वजित राणे यांच्याशी पर्रीकर सरकारमधील मंत्री विजय सरदेसाई यांनी मंगळवारी सकाळी फोनवरून संवाद साधला. काँग्रेसमध्ये फुट पडणार याचे भाकित आम्ही केले होते. त्यामुळे काँग्रेसचे दोन आमदार फुटतात याविषयी आमचा आक्षेप असण्याचे कारणच नाही. मात्र सत्ताधारी आघाडीच्या घटक पक्षातील कुठल्याच मंत्र्याला डच्चू दिला जाऊ नये असे मंत्री सरदेसाई यांनी मंत्री राणो यांना सांगितले आहे. मगोपचे मंत्री बाबू आजगावकर यांना डच्चू देऊन सोपटे यांना मंत्री केले जाईल अशा प्रकारची चर्चा राजकीय गोटात आहे पण त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मुख्यमंत्री पर्रीकर हे स्वत: सध्या आजारी असून ते त्यांच्या दोनापावल येथील निवासस्थानीच आहेत.