पणजी - वास्को सिटी आणि पणजीला जोडणा-या महामार्गावर अमोनिया वायूने भरलेला टँकर पलटी झाल्याने गोव्यात एकच खळबळ उडाली आहे. दोन महिलांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोव्यातील चिकालीम गावाजवळ हा अपघात झाल्यामुळे गावातील घरे रिकामी करण्यात आली असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
शुक्रवारी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. मुरगाव जेटीवरून अमोनिया वायू घेऊन जुवारी उद्योगाच्या दिशेने निघालेला टँकर चिखली येथे दाबोळी विमानतळ रस्त्यावर उलटला पडण्याची घटना शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. यामुळे वायू गळती झाली व परिसरातील लोकांना अस्वस्थ वाटू लागले. मोठी खळबळ उडाल्यानंतर राज्य सरकारच्या यंत्रणोचीही धावपळ सुरू झाली. शुक्रवारी (19 जानेवारी) चिखली परिसरातील चार विद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
मुरगाव, वास्को, दाबोळी, चिखली हा सगळा परिसर औद्योगिकरण झालेला आहे. संध्याकाळी सात वाजेनंतर वायू घेऊन आणि अन्य औद्योगिक माल घेऊन मोठे टँकर व ट्रक विमानतळ मार्गावरून धावत असतात. मध्यरात्री अशा वाहनांची वाहतूक ही जास्त असते. अमोनिया वायू गळती होण्याची मोठी घटना अलिकडे गोव्यात घडली नव्हती. चिखली येथे हा टँकर उलटून पडला त्यावेळी परिसरातील लोक साखरझोपेत होते. अमोनिया वायू गळतीमुळे लोकांना अस्वस्थ वाटू लागले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले. शासकीय यंत्रणोला माहिती मिळाल्यानंतर धावपळ सुरू झाली. मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा यांनी आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली व तातडीने 108 रुग्णवाहिका सेवेखाली चार रुग्णवाहिका मागवून घेतल्या.
एमपीटीच्याही रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. लोकांनी घराबाहेर पडू नये अशी सूचना करण्यात आली. सकाळी 9 वाजेनंतर स्थिती सुधारली. सलग पाच तास टँकरवर पाण्याचा फवारा केला गेला. आता स्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. लोकही सुरक्षित आहेत. कुणालाही इजा पोहोचलेली नाही. रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. शाळांना सुट्टी दिली गेली आहे. वास्को, चिखली तसेच विमानतळ मार्गावर लहानमोठे अपघात सतत घडत असतात. वायू गळतीचा अनुभव मात्र प्रथमच आला.
दरम्यान, गोव्यात अगोदरच शुक्रवारी पर्यटक टॅक्सींचा संप सुरू झाला आहे. यामुळे पर्यटक चिंतेत आहेत. तशात पुन्हा वायू गळतीची घटना घडल्यानंतर त्याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली व चिंताही व्यक्त होऊ लागली. टॅक्सी व्यवसायिकांनी पूर्णपणे बंद पाळल्यामुळे पर्यटकांना व स्थानिकांनाही थोडी गैरसोय जाणवत आहे. तथापि, गोवा पर्यटन विकास महामंडळ, कदंब वाहतूक महामंडळ व अन्य यंत्रणांनी मिळून वाहतुकीची पर्यायी व्यवस्था केली आहे