वास्को (गोवा) : मुरगाव बंदरात अमोनियाचा साठा घेऊन आलेल्या जहाजातून तो बंदराच्या भूमिगत वाहीनीद्वारे अमोनिया टाकीत भरण्याची प्रक्रीया चालू असताना अचानक अमोनियाची गळती होण्याची घटना मंगळवारी (दि.६) घडली. जहाजातून टाकीत अमोनिया भरताना गळती व्हायला लागल्याचे मुरगाव पोर्ट अथोरेटी आणि पारादीप फॉस्फेट्सच्या अग्निशामक दलाच्या अधिकारी - जवानांना कळताच त्यांनी त्वरित पावले उचलून गळती थांबवली. बंदरात सुरू झालेली अमोनिया गळती कीरकोळ स्वरुपात होती अशी माहीती वास्को अग्नशामक दलाकडून प्राप्त झाली.
वास्को अग्निशामक दलाचे प्रमुख दिलीप बिचोलकर यांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी दुपारी १२.१० च्या सुमारास त्यांना मुरगाव बंदराच्या धक्का क्रमांक ८ वर अमोनिया गळती होत असल्याची माहीती मिळाली. वास्को अग्निशामक दलाच्या जवानांनी बंबासहीत त्वरित घटनास्थळावर धाव घेतली असता तेथे त्यापूर्वीच मुरगाव पोर्ट अथोरेटी आणि पारादीप फॉस्फेट्सच्या अग्निशामक दलाचे जवान अमोनिया गळती थांबवण्यासाठी काम करताना दिसून आले. त्या दोन्ही दलाच्या जवानांनी उचित पावले उचलून आणि अमोनियासाठा घेऊन आलेल्या ‘एस टी ओस्लो’ जहाजाने टाकीत पाठवण्यात येणारा अमोनियासाठा बंद करून गळती थांबवली.
मुरगाव बंदरातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार मंगळवारी एस टी ओस्लो जहाज पारादीप फॉस्फेट्स कंपनीचा अमोनियासाठा घेऊन बंदराच्या धक्का क्रमांक ८ वर दाखल झाला. त्यानंतर जहाजातून मुरगाव बंदरातील अमोनिया टाकीत साठा भरण्याच्या कामाला सुरवात झाली होती. जहाजातील अमोनियासाठा टाकीत भरण्यासाठी बंदरातील भूमिगत वाहीनीची जोडणी जहाजाला करण्यात येताना अचानक अमोनिया गळती व्हायला सुरवात झाल्याचे जहाजातील कर्मचारी - अधिकाºयांना जाणवले. तसेच मुरगाव बंदरात असलेल्या मुरगाव पोर्ट अथोरेटी आणि पारादीप फॉस्फेट्सच्या अग्निशामक दलाच्या जवानांना अमोनिया गळती झाल्याचे दिसून आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचे फव्वारे मारण्यास सुरवात करून आणि अमोनिया गळती थांबवण्यासाठी इतर उचित पावले उचलली. तसेच एस टी ओस्लो जहाजातील कर्मचाºयांनी बंदरातील अमोनिया टाकीत साठा पाठवण्याचे काम बंद केल्याने मुरगाव बंदराच्या धक्का क्रमांक ८ मध्ये सुरू झालेली गळती काही मिनिटातच बंद झाली अशी माहीती प्राप्त झाली. जहाजातून अमोनिया टाकीत साठा भरण्याचे काम सुरू केल्यानंतर अमोनिया गळती होण्यामागचे नेमके कारण काय त्याबाबत योग्य तपासणी करण्यात येत असल्याची माहीती सूत्रांनी दिली. तपासणी आणि जेथे दुरूस्तीची गरज आहे ती झाल्यानंतर सर्वकाही ठीक असल्याची पूर्ण खात्री झाल्यानंतरच त्या जहाजातील अमोनियासाठा टाकीत भरण्यात येणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली.