मडगाव : पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्महत्या करण्यास पुलावरुन खाली उडी मारलेल्या एका विवाहितेचा जीव वाचला. पायराबांद येथे आज रविवारी दुपारी अकराच्या दरम्यान ही घटना घडली. दिपिका शुभरा (२५) असे त्या महिलेचे नाव असून, ती मूळ कारवार जिल्हयातील यल्लापूर येथील आहे. सासरची मंडळी तीचा छळ करीत होती. त्यामुळे कंटाळुन ती आत्महत्या करण्यासाठी जात होती अशी माहिती उघड झाली आहे. कोटामळ येथे राहणाऱ्या त्या विवाहितेला एक मूलगीही आहे.
तिच्या विवाहाला सहा वर्षे पुर्ण झाली आहे. सायकलवरुन ती जात असताना मोबाईलवरुन आपण जीव दयायला जात असल्याचे बोलत होती. यावेळी रस्त्यावर कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक कविता रावत व अन्य पोलिस उभे होते. रावत यांनी तिचे बोल ऐकले, त्यानंतर लागलीच तिने आपला पोलिस राजेश वेळीप यांना त्या महिलेचा पाठलाग करण्यास सांगितले. सुमारे एक किलोमीटर वेळीप हा धावत तिच्या पाठीमागे गेला.
पायराबांद येथे पोहचल्यानंतर तिने पुलाववरुन उडी मारली. वेळीप यांनी लागलीच उडी मारुन स्थानिकांच्या मदतीने तीला पाण्याबाहेर काढले व नंतर उपचारासाठी बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पोलिसांनी नंतर बायलाचो एकवोटच्या अध्यक्षा आवदा व्हिएगस यांनाही बोलावून घेतले. आता त्या महिलेच्या सासरच्या मंडळीची चौकशी केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. सदया दिपिकाची प्रकृती चांगली आहे