लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात गेल्या १० महिन्यांत पर्यटकांची संख्या दुप्पट झाली आहे. ऑगस्ट २०२३ ते मे २०२४ या दहा महिन्यांचा काळात राज्यात तब्बल ७८ लाख ६७ हजार २३९ देशी-विदेशी पर्यटक आले. म्हणजे दिवसाला सरासरी २६ हजारांच्या आसपास पर्यटक गोव्यात आले, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी अधिवेशनात लेखी स्वरूपात दिली आहे. आमदार वीरेश बोरकर यांनी हा लेखी प्रश्न मांडला होता.
उत्तरात नमूद केलेल्या माहितीनुसार, राज्यात ७८ लाख ६७ हजार २३९ एकूण पर्यटकांपैकी ७५ लाख २९ हजार ३१४ हे देशी पर्यटक आहेत. तर ३ लाख ३७ हजार ९२५ हे विदेशी पर्यटक आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर काही ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. पण, मागील तीन वर्षांच्या तुलनेत या दहा महिन्यांत पर्यटकांची संख्या दुप्पट वाढली आहे.
पर्यटन खात्याने पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी विविध मार्गे प्रोत्साहन दिले आहे. देश-विदेशात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. रोड शो आयोजित केले जातात. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढत आहे. तसेच गोवा राज्य हे जागतिक पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांची संख्याही गोव्यात वाढत आहे.